Thursday, January 29 2026 | 01:01:52 PM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन आणि दूरदृष्टीला अभिवादन करणाऱ्या नमोत्सव या भव्य मल्टीमीडिया सांगितिक महोत्सवाने अहमदाबाद झाले मंत्रमुग्ध

Connect us on:

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. अहमदाबादसाठी काल ‘नमोत्सव’ या भव्य सादरीकरणामुळे कालची संध्याकाळ म्हणजे अभिमान, संस्कृती आणि प्रेरणेचा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. नमोत्सव या  एक भव्य संगीतमय मल्टीमीडिया कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन, नेतृत्व आणि त्यांच्या दूरदर्शी प्रवासाचे गुणगान करण्यात आले. ‘संस्कारधाम’ द्वारे आयोजित या 3-दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. कला, संगीत, तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या माध्यमातून सेवा, दृढ संकल्प आणि राष्ट्र उभारणीत रुजलेला एक विलक्षण प्रवास यावेळी उलगडण्यात आला.

   

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘नमोत्सव’ या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, “नमोत्सव हे अशा नेत्याच्या जीवनाचे चित्रण आहे, ज्यांनी केवळ 11 वर्षांत 140 कोटी भारतीयांना 2047 पर्यंत भारताला सर्व बाबतीत जगातील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरित केले. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा एखादी व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट राष्ट्रीय ध्येयासाठी समर्पित करते, ते साध्य करण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करते आणि नंतर हेच स्वप्न पाहणाऱ्या लोकांची एक मोठी टीम देशभर तयार करते.”

नमोत्सव’ ही एक भव्य मंच निर्मिती आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रेरणादायी जीवन कलात्मकरित्या उलगडते—गुजरातच्या वडनगरमधील त्यांच्या सामान्य पार्श्वभूमीमधील प्रारंभापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या परिवर्तनीय नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास आहे. थेट सादरीकरण, संगीत, नृत्य, कथन आणि अत्याधुनिक मल्टीमीडिया दृश्यांच्या अखंड मिश्रणाद्वारे, या कार्यक्रमाने त्यांच्या वैयक्तिक प्रवासाला आणि भारताच्या विकासपथाला आकार देणारे महत्त्वाचे टप्पे अधोरेखित केले आहेत.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर, सांस्कृतिक अभ्यासक, आध्यात्मिक नेते, कलाकार, विद्वान आणि विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते, जे या कार्यक्रमाचे व्यापक आकर्षण आणि महत्त्व दर्शवते.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कलाकारांचे चित्तथरारक सादरीकरण. एरियल व्ह्यूद्वारे संस्कृती, संगीत आणि संदेशांचा मेळ घालून एक अनोखा दृश्य अनुभव सादर करण्यात आला, ज्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या सादरीकरणात 150 हून अधिक कलाकारांचा सहभाग होता, ज्यांच्या प्रभावी कामगिरीने नरेंद्र मोदी यांचे जीवन आणि नेतृत्वाच्या प्रवासातील निर्णायक क्षण जिवंत केले. विशेष प्रकारे रचना केलेल्या प्रयोगांच्या माध्यमातून, त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील ऐतिहासिक विकास उपक्रमांची आठवण करून देण्यात आली. गुजरातचे विकास मॉडेल आणि सुशासन नंतर राष्ट्रीय प्रगतीसाठी ब्लू प्रिंट कशी बनली, यावर यावेळी भर देण्यात आला.

या कथनात पायाभूत सुविधा, शासन सुधारणा, सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकास यांमधील ऐतिहासिक कामगिरीचे दर्शन घडवण्यात आले. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभागातून विकास करण्याचे तत्वज्ञान यावेळी अधोरेखित करण्यात आले. गुजरातमध्ये घातलेला पाया कशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर धोरणे आणि प्रशासन आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला, हे या कार्यक्रमातून दिसून आले.

   

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या प्रकाशन विभाग आणि केंद्रीय संचार ब्युरो तसेच पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन आणि कार्याशी संबंधित माहिती प्रसारित करण्यात सक्रिय भूमिका बजावली. केंद्रीय संचार ब्युरो आणि प्रकाशन विभाग, अहमदाबाद यांच्या वतीने कार्यक्रमस्थळी एक विशेष पुस्तक स्टॉल उभारण्यात आला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांचे विचार, नेतृत्व तत्त्वज्ञान आणि सार्वजनिक सेवा प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या प्रकाशनांचा समृद्ध संग्रह प्रदर्शित करण्यात आला होता.

या पुस्तक स्टॉलने अभ्यागत, विद्वान, विद्यार्थी आणि जनतेचे  लक्ष वेधून घेतले. नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील आणि कार्यातील विविध पैलूंची माहिती देणारी सुमारे 14 प्रमुख पुस्तके प्रदर्शित करण्यात आली.

याशिवाय, प्रकाशन विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचे संकलन प्रदर्शित केले. त्यावरून  सुशासन, विकास, सामाजिक सुधारणा आणि जागतिक भागीदारीविषयीचा त्यांचा  दृष्टीकोन दिसून येतो.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी; पत्र सूचना कार्यालयाचे महासंचालक धीरेंद्र ओझा आणि पीआयबी अहमदाबादचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत पाठराबे यांनी पुस्तक दालनाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांचे जीवन  आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान दर्शवणारे अधिकृत आणि माहितीपूर्ण साहित्य संकलित करून सादर करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

   

संस्कृतीच्या माध्‍यमातून मूल्ये, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तन संप्रेषित कार्य कशा पध्‍दतीने करता येवू शकते याचे ‘नमोत्सव’ कार्यक्रम हे एक प्रभावी उदाहरण म्हणून समोर आले आहे.  पारंपरिक कला प्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून, या कार्यक्रमाने विविध पिढ्या  आणि पार्श्वभूमीच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळवले.

याप्रसंगी केलेल्या संपूर्ण सादरीकरणादरम्यान, प्रेक्षकांनी परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी आवश्‍यक असलेली लवचिकता, नावीन्य आणि लोकसेवेच्या भावनेचा गौरव करणारे क्षण अनुभवले. या निर्मितीने नम्रता, समर्पण आणि सामूहिक प्रयत्नांच्या संकल्पना अधोरेखित केल्या. यामुळे परिवर्तनकारी नेतृत्व हे लोककेंद्रित शासनामध्ये खोलवर रुजलेले असते, ही कल्पना दृढ झाली.

‘नमोत्सव’ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून नाही, तर भारताच्या लोकशाही प्रवासाचा, विकासाच्या आकांक्षांचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा उत्सव म्हणून उदयास आला. या कार्यक्रमाने इतिहास घडवण्यात नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली आणि आगामी  पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या कथा सांगण्यासाठी सर्जनशील अभिव्यक्तीच्या सामर्थ्याची पुष्टी केली.

   

About Matribhumi Samachar

Check Also

विविध सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलावंतांना शिष्यवृत्ती प्रदान योजना (SYA)

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 केंद्र सरकारच्या ‘विविध सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलावंतांना शिष्यवृत्ती’(SYA) योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत 1079 युवा …