नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. हे पदवीधर ‘विकसित भारत @2047’ चे शिल्पकार आहेत असे वर्णन त्यांनी केले.
दीक्षांत समारंभ हा केवळ शैक्षणिक यशाचा उत्सव नाही, तर अधिक मोठ्या जबाबदारीकडे होणारी वाटचाल दर्शवणारा एक गंभीर क्षण आहे, असे पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना उपराष्ट्रपती म्हणाले. त्यांनी पदवीधरांना आठवण करून दिली की, त्यांच्या पदव्या समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी ज्ञानाचा उपयोग करण्याची जबाबदारी सोबत घेऊन येतात.
श्री अरबिंदो यांच्या तत्त्वज्ञानामुळे उच्च शिक्षणाला आजही दिशा मिळत असून ज्ञान, अध्यात्म आणि कृती यांचा समन्वय साधत राष्ट्रीय प्रगती आणि जागतिक सलोख्यासाठी योगदान देऊ शकणारी मने घडवली जातात, असे त्यांनी नमूद केले.
‘विकसित भारत @2047’ च्या दिशेने भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला दृष्टीकोन एक समृद्ध, सर्वसमावेशक आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी एक सर्वसमावेशक आराखडा प्रदान करतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हा एक मोठा बदल आहे—घोकंपट्टीपासून चिकित्सक विचारसरणीकडे, एकच शैक्षणिक शाखा ते बहुविद्याशाखीय शिक्षणाकडे आणि परीक्षा-केंद्रित दृष्टिकोनापासून सर्वांगीण विकासाकडे नेणारे हे धोरण आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. पदवीधरांनी या धोरणाच्या भावनेचे दूत बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलन, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल संपर्कप्रणालीद्वारे जगामध्ये होत असलेल्या वेगवान बदलांबद्दल विद्यार्थ्यांना सावध करताना उपराष्ट्रपतींनी तंत्रज्ञानाबद्दलच्या उत्साहाची नैतिक दक्षतेशी सांगड घालणाऱ्या संतुलित दृष्टिकोनाचे आवाहन केले. त्यांनी तरुणांना ‘अमलीपदार्थांना नाही’ असे ठामपणे सांगण्याचे आणि आपल्या सहकाऱ्यांनाही असे करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
समारोप करताना त्यांनी पदवीधरांना आवाहन केले की, शिक्षणाने त्यांना सुसंस्कृत माणूस, जबाबदार नागरिक आणि सामाजिक जाणीव असलेले व्यावसायिक घडवावे – जिथे ज्ञानाला नम्रतेची, तंत्रज्ञानाला मानवी मूल्यांची आणि यशाला सामाजिक जबाबदारीची जोड असेल.
Matribhumi Samachar Marathi

