
या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड, फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग, सौरऊर्जेवर चालणारे पादचारी मार्ग, जैवशौचालये, जैवविविधता तलाव तसेच सर्क्युलर इकोलॉजीच्या तत्त्वांवर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर: वातावरणाचा विचार करता संवेदनशील असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात स्थानिक जैवविविधता पुन्हा साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट (AKAH) इंडियातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे जैवविविधता उद्यान सुरू करण्यात आले आहे. हे जैवविविधता उद्यान खाम नदीच्या काठावर विकसित करण्यात आले असून, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या शहरी नदीकाठ पुनरुज्जीवन आणि पर्यावरणीय पुनर्स्थापन उपक्रमाचा हा एक भाग आहे. हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि प्रिन्स सादरुद्दीन आगा खान फंड फॉर द एन्व्हायर्नमेंट (PSAKFE) यांच्या सहाय्याने राबवण्यात आला आहे.
190,000 चौ. फुट क्षेत्रफळावर पसरलेल्या या उद्यानामुळे शहरातील स्थानिक हवामान सुधारण्यास मदत होईल, शाश्वत जल-व्यवस्थापन आणि स्वच्छता पद्धतींसाठी उत्तम आदर्श निर्माण होईल आणि नागरिक खाम नदी व परिसरातील स्थानिक पर्यावरणाशी पुन्हा जोडले जातील, अशी अपेक्षा आहे. उद्यानातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये स्थानिक, औषधी, शोभिवंत आणि बांबू प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड; फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग; जैवविविधतेला पाठबळ देत नैसर्गिक जलगाळणीची प्रक्रिया घडवून आणणारा कृत्रिम तलाव; पर्यावरणपूरक पादचारी मार्ग; सौरऊर्जेवर चालणारी प्रकाशयोजना; बांबू गझिबो जैवशौचालये; तसेच नागरिकांच्या सहभागासाठी अर्थविवरणात्मक आणि शैक्षणिक सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय, उद्यानात 59 KLD (किलोलिटर प्रति दिन) क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात आला आहे. पाण्याचा पुनर्वापर आणि सर्क्युलर इकोलॉजी या तत्त्वांवर आधारित हा एसटीपीदररोज खाम नदीतून घेतलेले सांडपाणी शुद्ध करतो आणि तेच रिसायकल केलेले पाणी जैवविविधता उद्यानातील सिंचनासाठी वापरण्यात येते.
लागवडीच्या उपक्रमाचा भाग म्हणून या उद्यानात स्थानिक प्रजातींची 1,067 रोपे, औषधी वनस्पतींच्या 42 जाती, 1,072 शोभिवंत वनस्पती आणि बांबूची 600 रोपे लावण्यात आली आहेत. दुष्काळात टिकून राहण्याची क्षमता, अर्धशुष्क हवामानाशी सुसंगतता, फुलपाखरे, पक्षी व कीटकांना आकर्षित करणारी परागणक्षमता, तसेच कार्बन शोषण आणि माती स्थिरीकरणातील भूमिका लक्षात घेऊन या प्रजातींची काळजीपूर्वक निवड करण्यात आली आहे.
उद्यानातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम तलाव, जो पर्यावरणीय तसेच उपयुक्ततेच्या दृष्टीने विकसित करण्यात आला आहे. हा तलाव जलवनस्पती आणि जलचरांना आधार देतो, जैवविविधतेत भर घालतो आणि पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यासाठी नैसर्गिक गाळणी प्रणाली म्हणून या तलावाचा उपयोग होतो. यासोबतच पावसाचे पाणी साठवून ठेवणे आणि भूजलाची पातळी वाढविण्यातही हा तलाव महत्त्वाची भूमिका बजावतो.
“वर्षानुवर्षे या जागेवर कचरा साठत होता आणि अत्यंत दुर्लक्षित जागा होती. आज मात्र या जागेचे रूपडे पालटले आहे. येथे दिसणारे परिवर्तन हे महानगरपालिका पथक, स्वच्छता कर्मचारी आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या सातत्यपूर्ण कामाचे प्रतिबिंब आहे. विस्मरणात गेलेली ही जागा आता शहरासाठी आणि त्याच्या नागरिकांसाठी स्वच्छ, उपयोगी आणि अर्थपूर्ण ठरली आहे,” असे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले.
“अशा प्रकारची शहरी जैवविविधता उद्याने ही केवळ सौंदर्यवर्धनासाठीची पूरक साधने नाहीत, तर ती हवामानाशी संबंधित अत्यावश्यक पायाभूत सुविधा आहेत,” असे आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा म्हणाल्या. “खाम नदीच्या काठावर स्थानिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच आम्ही शहराचे मायक्रोक्लायमेट (स्थानिक पातळीवरचे हवामान नियंत्रित करणारी परिस्थिती) सुधारत आहोत, जलव्यवस्था अधिक सक्षम करत आहोत आणि समुदायांना निसर्गाशी पुन्हा जोडणारी सर्वसमावेशक सार्वजनिक स्थळे निर्माण करत आहोत. विशेषतः मराठवाड्यासारख्या हवामानदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये हवामानबदल सक्षमता ही पर्यावरणशास्त्र, समुदायाचा सहभाग आणि नैसर्गिक संसाधनांच्या दीर्घकालीन संवर्धनावर आधारित असली पाहिजे, या आमच्या विश्वासाचेच हे उद्यान प्रतिबिंब आहे.”
पक्ष्यांच्या विविधतेला चालना देण्यासाठी विशेष अधिवास क्षेत्र म्हणून एक स्वतंत्र पक्षी उद्यान विकसित करण्यात येत आहे. या पक्षी उद्यानाचा उद्देश स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी प्रजातींना आकर्षित करणे हा असून, हे ठिकाण शहरी परिसरातील पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अध्ययन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
प्रदूषणाच्या वाढत्या पातळीला उत्तर देण्यासाठी आणि शहरी परिसरात स्थानिक जैवविविधतेचे पुनःस्थापना करण्याच्या गरजेतून आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाने मराठवाडा विभागाची निवड केली आहे. या प्रकल्पाचा उद्देश शहरातील स्थानिक हवामानात सुधारणा करणे, उष्णतेचा ताण कमी करणे, शाश्वत जल व स्वच्छता पद्धतींना प्रोत्साहन देणे, तसेच नागरिकांना नदी आणि तिच्या आजूबाजूच्या परिसंस्थेशी पुन्हा जोडणे हा आहे.
मराठवाड्यात आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या या उपक्रमामुळे वाढती शहरी उष्णता, प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास या समस्यांवर उपाय योजला जाणार आहे. तसेच भारतातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये हवामान बदलाशी जुळवून घेत शहरी हरित स्थळे विकसित करण्यासाठी हा उपक्रम म्हणजे अनुकरणीय आराखडा ठरतो.
उद्घाटन प्रसंगी डॉ. विजय पाटील, उपआयुक्त (उद्यान), नंदकिशोर भोंबे, उपायुक्त (कचरा व्यवस्थापन), रवींद्र जोगदंड, उपायुक्त (स्मार्ट सिटी), संजय सुरडकर, सहाय्यक आयुक्त, तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त व वॉर्ड अधिकारी सविता सोनावणे उपस्थित होत्या.
Featured Article
Matribhumi Samachar Marathi

