नवी दिल्ली, 1 जानेवारी 2026. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. द लाइट अँड द लोटस: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन या संकल्पनीय शीर्षकाअंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.
शंभर वर्षांपेक्षा जास्त काळानंतर पिप्रहवा अवशेष मायदेशी परत आणले गेले आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय तसेच कोलकाता इथल्या इंडियन म्युझियम या संग्रहालयात जतन केलेले पुरातत्व साहित्य देखील एकाच ठिकाणी मांडले जाणार आहे.
पिप्रहवा अवशेषांचा शोध 1898 मध्ये लागला होता. हे अवशेष बौद्ध धर्माच्या प्रारंभाच्या काळातील पुरातत्व अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. हे अवशेष भगवान बुद्धांशी थेट संबंधित असलेल्या सर्वात जुन्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अवशेषांपैकी एक आहेत. पुरातत्वीय पुराव्यांनुसार, पिप्रहवा हे ठिकाण प्राचीन कपिलवस्तूशी संबंधित असल्याचे मानले जाते. याच ठिकाणी भगवान बुद्धांनी गृहत्यागापूर्वीचे आपले सुरुवातीचे जीवन व्यतीत केले होते.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून भगवान बुद्धांच्या शिकवणीसोबतचे भारताच्या प्राचीन आणि कालातीत संस्कृतीच्या नाते अधोरेखित होणार आहे. यासोबतच या प्रदर्शनातून भारताचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याची पंतप्रधानांची वचनबद्धताही ठळकपणे दिसून येणा आहे. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्न, तसेच संस्थात्मक सहकार्य आणि सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या नवोन्मेषी भागीदारीमुळे हे अवशेष मायदेशी परत आणता आले आहेत.
या प्रदर्शनाअंतर्गत विविध संकल्पनांवर आधारित मांडणी केली जाणार आहे. त्यानुसार सांची स्तूपापासून प्रेरित एक प्रारुप या प्रदर्शनाचे मध्यवर्ती केंद्र असेल. याठिकाणी राष्ट्रीय संग्रहालयातील आणि मायदेशी परत आणलेले मूळ अवशेष एकत्र मांडलेले असतील. याशिवाय प्रदर्शनातील इतर विभागांमध्ये पिप्रहवाचा पुनर्शोध (Piprahwa Revisited), भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रसंग (Vignettes of the Life of Buddha), मूर्तातील अमूर्त: बौद्ध शिकवणुकीची सौंदर्यात्मक भाषा, सीमेपलीकडील बौद्ध कला आणि आदर्शांचा विस्तार आणि सांस्कृतिक कलाकृतींचे प्रत्यावर्तन: एक निरंतर प्रयत्न या विषयांचा समावेश आहे.
लोकांना संपूर्ण प्रदर्शनातील मांडणी सहजतेने समजून घेता यावी यासाठी प्रदर्शनात दृकश्राव्य माध्यमांचाही वापर केलेला असेल. याअंतर्गत माहितीपट, डिजिटल पद्धतीने उभारलेली पुनर्रचित प्रारुपे आणि मल्टीमीडिया सादरीकरणाचा समावेश असेल. या माध्यमातून भगवान बुद्धांचे जीवन, पिप्रहवा अवशेषांचा शोध आणि त्यांच्याशी संबंधित कलापरंपरांची माहिती पर्यटकांना जाणून घेता येणार आहे.
Matribhumi Samachar Marathi

