Saturday, January 24 2026 | 11:29:16 PM
Breaking News

नववर्षानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा देशवासियांना संदेश

Connect us on:

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026. आपण सर्वजण 2026 या नववर्षाचे स्वागत करत असताना, मी भारतातील आणि सर्व जगभरातील माझ्या बंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

2025 हे वर्ष नवीन विश्वास, सामूहिक संकल्प आणि राष्ट्राभिमानाच्या दुर्दम्य भावनेसाठी सदैव स्मरणात राहील. आपल्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यापासून ते विविध क्षेत्रांमध्ये भारताचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यापर्यंत देशाने  एकतेने आणि स्पष्ट दृष्टिकोनाने प्रगती केली.

ऑपरेशन सिंदूरने आपल्या नागरिकांच्या रक्षणाची भारताची दृढ वचनबद्धता अधोरेखित केली आणि दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांना एक कठोर संदेश दिला की न्याय आणि संरक्षण चिरकाल कायम राहील तसेच  सार्वभौमत्वाला येणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा मुकाबला दृढतेने आणि निर्णायक कृतीने केला जाईल.

या वर्षभरात संसदेने अनेक ऐतिहासिक कायदे संमत केले ज्यातून विकसित भारताबद्दलची दृढ वचनबद्धता दिसून आली तसेच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त महत्त्वपूर्ण चर्चेचा देखील यात समावेश होता.

या वर्षात अनेक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक टप्पे अनुभवता आले. राम मंदिरातील ध्वजारोहण समारंभ आणि भव्य महाकुंभाने भारताच्या जागत्या वारशाकडे जगाचे लक्ष वेधले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील 2025  मधील भारताच्या कामगिरीने जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट झाले आहे.

क्रीडा क्षेत्रातही  2025 या वर्षात  राष्ट्रासाठी अनेक अभिमानाचे क्षण अनुभवता आले.

भारताच्या कन्या आणि पॅरा-ऍथलिटसनी मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीतून राष्ट्राला प्रेरणा मिळाली.

आज आपण सर्व 2026 मध्ये पदार्पण करत असताना, मी भारतातील सर्व युवकांना, राष्ट्राच्या भविष्याच्या रक्षकांना,  या नवीन वर्षाच्या निमित्ताने भारतमातेसाठी खालील पाच प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करतो:

1.   अमली पदार्थ किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून पूर्णपणे मुक्त राहणे आणि शिस्त, स्पष्टता आणि एखाद्या ध्येयासाठी जीवनाचे मार्गक्रमण करणे.

2.   तंत्रज्ञानाचा अंगीकार जबाबदारीने आणि नैतिकतेने करणे, नवोन्मेष आणि डिजिटल उपकरणांचा वापर राष्ट्र उभारणी आणि सर्वसमावेशक विकासाकरता करणे.

3.   योगाभ्यास, क्रीडा आणि संतुलित जीवनशैलीचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे.

4.   संवैधानिक मूल्यांचे, सचोटीचे आणि सामाजिक सलोख्याचे जतन करणे आणि भारताच्या लोकशाहीचा पाया मजबूत करणे.

5.   सेवा, कामातील उत्कृष्टता आणि भारताच्या आदर्शांप्रति वचनबद्धतेद्वारे राष्ट्राच्या प्रगतीसाठी निःस्वार्थपणे योगदान देणे.

या मूल्यांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या युवकांच्या ऊर्जेने प्रेरित होऊन आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत  ‘विकसित भारत @ 2047’ या दृष्टीकोनाच्या दिशेने भारत आपली निर्धारपूर्ण वाटचाल सातत्याने सुरू ठेवेल.

हे नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी  शांतता, समृद्धी आणि प्रगती घेऊन येवो.

आपणा  सर्वांना 2026 हे नववर्ष आरोग्यपूर्ण, समृद्ध आणि आनंदी जावो अशी मी शुभेच्छा देतो.

जय हिंद! भारतमाता चिरायू असो!

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …