उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नई येथील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले.
त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. पदवी मिळणे म्हणजे आयुष्यातील नवीन टप्प्याची सुरुवात असून या टप्प्यात अधिक जबाबदाऱ्यांबरोबर संधीही उपलब्ध होतात असे त्यांनी सांगितले. हे पदवीधर आपली व्यावसायिक कौशल्ये, सहानुभूती आणि बांधिलकी यांद्वारे समाजात सकारात्मक योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तमिळनाडू पूर्वी ज्ञानाचे केंद्र आणि सागरी व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते, असे त्यांनी सांगितले. येथील व्यापाऱ्यांनी भारताच्या कल्पना, नीतिमूल्ये आणि संस्कृती जगभर पोहोचवल्या. त्यावरुन भारताची आत्मविश्वासपूर्ण ओळख आणि शिकण्याची व देवाणघेवाणीची सज्जता दिसून येते, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
विकसित भारत@2047 या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या दृष्टिकोनाचा उल्लेख त्यांनी केला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा, विशेषतः युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले.
झपाट्याने होत असलेले तंत्रज्ञानातील बदल विषद करून ते म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांमध्ये बदल होत आहे. त्यामुळे सतत शिकण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नियमितपणे आपली कौशल्ये वाढवावीत, आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी आणि आपल्या मुख्य विषयांपलीकडेही नवीन तंत्रज्ञानाशी जोडले जावे, असे त्यांनी सांगितले.
मूल्याधारित शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शैक्षणिक उत्कृष्टता ही नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीवर आधारित असली पाहिजे, असे ते म्हणाले.
संस्थेच्या परिसरातून बाहेर पडल्यानंतरच्या आयुष्याबद्दल उपराष्ट्रपतींनी सल्ला दिला. यश आणि अपयश हे जीवनाचा भाग आहेत. दोन्ही गोष्टींना संतुलन, चिकाटी आणि मानसिक ताकदीने सामोरे जायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यश मिळवण्यासाठी शॉर्टकट न घेता, इतरांशी तुलना न करता, स्वतःचे ध्येय ठरवून सातत्याने मेहनत करा आणि आपली खास क्षमता वापरा, असे त्यांनी सांगितले. पदवीधरांनी अर्थपूर्ण आणि समाजासाठी उपयोगी जीवन जगावे. असे जीवन त्यांच्या स्वतःच्या विकासाला मदत करेल आणि देशाची प्रगती घडवेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला तमिळनाडू सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सुब्रमण्यम, संस्थेचे कुलपती डॉ. एस सी शन्मुगम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Matribhumi Samachar Marathi

