भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्थापन आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने (AYUSHEXCIL) आज नवी दिल्लीत आपला चौथा स्थापना दिन साजरा केला.
स्थापनेपासून, आजपर्यंत परिषदेने निर्यातदारांची क्षमता वाढवणे, निर्यात प्रक्रिया आणि नियामक अनुपालन सुलभ करणे, तसेच प्रमुख परदेशी बाजारपेठांमध्ये बी2बी बैठका, आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, परिसंवाद आणि संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यावर केंद्रित अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
आयुष आणि हर्बल उत्पादनांच्या निर्यातीत 6.11 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, जी 2023-24 मधील 649.2 लाख अमेरिकन डॉलर्सवरून 2024-25 मध्ये 688.9 लाख अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. परिषदेच्या स्थापनेनंतर, या वाढीला गती मिळाली असून यातून भारताच्या पारंपरिक औषध आणि हर्बल उत्पादनांसाठी वाढलेली जागतिक पोहोच आणि वाढती आंतरराष्ट्रीय मागणी दिसून येते.
भारताच्या पारंपरिक औषध प्रणालींना (आयुष) द्विपक्षीय व्यापार करारांमध्ये आरोग्य-संबंधित सेवा आणि पारंपरिक औषधांवर समर्पित परिशिष्टांसह औपचारिक मान्यता मिळाली आहे, ज्यात भारत-ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागिदारी करार आणि भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार यांचा समावेश आहे .
ही परिषद पाचव्या वर्षात पदार्पण करत असताना, परिषदेचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करणे, मुक्त व्यापार करारांतर्गत संधींचा लाभ घेणे, गुणवत्ता आणि प्रमाणन चौकटींना प्रोत्साहन देणे तसेच भारताच्या पारंपरिक औषध प्रणालींची जागतिक स्वीकृती वाढवणे हे आहे.
हा वर्धापनदिन आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत, जागतिक आयुष आणि आरोग्य अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे वाढते नेतृत्व अधोरेखित करतो.
ही परिषद आयुष मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार कार्यरत असून वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी तसेच इतर भारतीय पारंपरिक आरोग्य सेवा प्रणालींशी संबंधित उत्पादने आणि सेवांच्या निर्यातीवर देखरेख ठेवते.
Matribhumi Samachar Marathi

