
अमरावती. एका ध्येय वेड्या युवकाने खेडेगावात राहून कठोर परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली मात्र, परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि यशाची गोडी चाखता आली नाही. मात्र तो थांबला नाही, त्याने प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर त्याने यशाचा गुलाल उधळला. ही गोष्ट आहे मनीष किसनराव राऊत यांची.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील सोनेगाव खर्डा येथील रहिवासी मनीष राऊत यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील मनीष राऊत यांनी गावातूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर धामणगाव रेल्वे येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु ध्येय मोठे होते, स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा चंग बांधला. घरची परिस्थिती जेमतेम म्हणून गावातील हॉटेल कृष्णा पॅलेस येथे नोकरी केली. सोबतच परीक्षेची तयारी सुद्धा केली. नोकरी आणि अभ्यास दोन्हीचा मेळ साधून अखेर जिल्हा न्यायालयाच्या क्लार्क पदाची परीक्षा उत्तीर्ण केली, मात्र त्या परीक्षेवर स्टे आणण्यात आला आणि मनीषला यशाचा गोडवा चाखता आला नाही. मात्र, मनीष यांनी प्रयत्न सोडले नाही, पुन्हा जोमाने परीक्षेच्या तयारीला लागले. अखेर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठसाठी घेण्यात आलेली शिपाई पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पुढेही परीक्षा देणार…
दिवस रात्र मेहनत करून ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, येवढ्यावर थांबणार नाही आहे. क्लर्क पदासाठी सुद्धा परीक्षेचा अर्ज केला आहे. पुढेही परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवणार आहे. मी माझ्या यशाचे श्रेय आई वडील, मार्गदर्शकांना देतो.
मनीष राऊत
Featured Article
Matribhumi Samachar Marathi

