नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025
ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी आज आशिया प्रशांत टेलिकम्युनिटीचे (एपीटी) सरचिटणीस मसानोरी कोंडो यांच्या उपस्थितीत दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषदेच्या (एसएटीआरसी) स्पेक्ट्रमवरील कार्यशाळेचे उद्घाटन केले. या तीन दिवसांच्या कार्यशाळेत एसएटीआरसी सदस्य देशांचे प्रतिनिधी, कार्यगट सदस्य, उद्योग तज्ज्ञ, अनेक सरकारी विभागांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती आहे.
ही कार्यशाळा आशिया प्रशांत टेलिकम्युनिटीने आयोजित केली आहे आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण तिचे यजमानपद भूषवत आहे.गोवा येथील हिल्टनच्या हॉटेल डबल ट्री येथे ही कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेचे उद्दिष्ट वेगाने विकसित होत असलेल्या दूरसंचार क्षेत्रात प्रभावी स्पेक्ट्रम व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करणे हे आहे.
स्पेक्ट्रमवरील या कार्यशाळेमुळे सहभागींमध्ये प्रमुख स्पेक्ट्रम व्यवस्थापन समस्यांबद्दल अधिक समज निर्माण होईल, अशी अपेक्षा असून यातून एसएटीआरसी कार्यकारी गटासाठी कृतीयोग्य मार्गदर्शक तत्त्वे तयार होतील. याव्यतिरिक्त, कार्यशाळेचे उद्दिष्ट सदस्य देश आणि उद्योग तज्ज्ञांमध्ये अधिक सहयोग प्रस्थापित करण्याचे आहे. परिणामी प्रभावी स्पेक्ट्रम वापरासाठी सर्वोत्तम पद्धती आणि धोरणे विकसित होतील.
ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी उद्घाटन सत्रातील आपल्या भाषणात,आजच्या डिजिटल काळात प्रभावी स्पेक्ट्रम व्यवस्थापनाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.दूरसंचार क्षेत्र नवोन्मेष आणि सक्षमीकरण,यात आघाडीवर असून डिजिटल परिवर्तनाला चालना देत जीवनाची गुणवत्ता वाढवणारे उपाय प्रदान करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.ही कार्यशाळा उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्पेक्ट्रम वाटप आणि धोरण विकास यावर विविध पैलू सामायिक करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करत असल्याचे त्यांनी सांगितले. सहयोग आणि सर्वोत्तम पद्धतींच्या आदानप्रदानाला चालना देत, ही कार्यशाळा, नियामक क्षमता उभारण्यास, सीमापार सहकार्य बळकट करण्यास आणि दूरसंचार क्षेत्रात शाश्वत विकासाला पाठबळ पुरवण्यात साहाय्यभूत ठरेल, असे लाहोटी यांनी सांगितले.
Matribhumi Samachar Marathi

