नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला.भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा, संरक्षण आणि कार्यक्षमता यांना चालना देण्यासाठी तसेच आधुनिकता आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून (ICAO )मंजुरी मिळाल्यानंतर या आधुनिक व्यवस्थेची अंमलबजावणी करणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे. इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना हा वैयक्तिक परवान्याचे डिजिटल रूप असून तो विमान चालकांसाठी असलेल्या पारंपारिक कागदावरच्या परवान्याची जागा घेईल. व्यवसाय सुलभता आणि डिजिटल इंडिया या भारत सरकारच्या उपक्रमांशी सुसंगत असलेल्या संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करून eGCA मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे हा परवाना सुरक्षितपणे प्राप्त करता येईल.
या वेळी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की “भारताच्या हवाई क्षेत्राची अभूतपूर्व वाढ बघता आपल्याला पुढील काळात लवकरच 20,000 वैमानिकांची गरज भासणार आहे. वैमानिक हा नागरी हवाई क्षेत्राचा कणा आहे. eGCA तसेच EPL च्या माध्यमातून आपण आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित उपायांमधून विमान चालकांना आरामदायक सोयी देत जागतिक स्तरावर त्यांचे रोजगार क्षमता वाढवत आहोत तसेच सुरक्षा संबंधित गोष्टी म्हणून ओळखपत्रांमध्ये रिअल टाईम प्रवेश प्रदान करत आहोत.”

अंमलबजावणीपूर्वी डीजीसीए ने विमान चालकांना स्मार्ट कार्ड प्रकारातील परवाने दिले होते आणि आत्तापर्यंत अशी बासष्ठ हजार कार्डे वितरित झाली आहेत. वर्ष 2024 मध्ये 20,000 कार्ड साधारण वितरित झाली होती म्हणजे प्रति महिना 1767 कार्डे. इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना सुरू झाल्यानंतर छापील कार्डांची गरज टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल, आणि परवाना प्रक्रिया हळूहळू सुरळीत करण्यात येईल याशिवाय या बदलामुळे कागद तसेच प्लास्टिक यांचा वापर कमी झाल्यामुळे शाश्वत पर्यावरणावर एक सकारात्मक परिणाम होईल.
Matribhumi Samachar Marathi

