Monday, January 05 2026 | 07:10:52 PM
Breaking News

राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाची ‘एनआयव्ही’ला भेट

Connect us on:

पुणे, 18 जून 2025

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. मनीषा वर्मा यांच्या दहा सदस्यीय राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाने आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट दिली.

तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग असून, हे प्रतिनिधीमंडळ शुक्रवार रोजी चंद्रपूर येथील ICMR-CRMCH ला देखील भेट देणार आहे.

‘एनआयव्ही’चे संचालक डॉ.नवीन कुमार यांनी संस्थेत सुरू असलेल्या विविध विषाणू संशोधन प्रकल्पांची माहिती दिली. नी कोविड-19 च्या विविध उपप्रकारांचे वेळीच वर्गीकरण करून त्याचे विश्लेषण केल्यामुळे देशाला योग्य धोरण आखण्यास मदत झाल्याचे स्पष्ट केले.

डॉ. कुमार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना अलीकडील कोविड-19 रुग्णसंख्येतील वाढ ही चिंतेची बाब नसल्याचे सांगितले. बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे असून उपचाराशिवायच ते बरे होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावर्षीच्या सुरुवातीला पुण्यात उद्भवलेल्या गिलियन-बार सिंड्रोम (GBS) प्रादुर्भावावेळी संस्थेने तातडीने कारवाई केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याचबरोबर, मंकीपॉक्स (Mpox), कसायनूर जंगल ताप (KFD), एच5एन1 आणि जपानी इंसेफेलायटीस या सर्वांसाठी लवकरच भारतात लसी उपलब्ध होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

डॉ. कुमार यांनी संस्थेतील नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या उच्च कार्यक्षम संगणकीय प्रणाली (High Performance Computing System – HPC) ‘नक्षत्रा’ बाबत माहिती दिली. या प्रणालीचे ICMR चे महासंचालक व आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बाही यांनी अलीकडेच उद्घाटन केले आहे, विषाणूंच्या जीनोमिक्स व जैवसांख्यिकी विश्लेषणासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

1952 साली रॉकफेलर फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू झालेल्या ‘व्हायरस रिसर्च सेंटर’ या संस्थेला 1978 मध्ये राष्ट्रीय दर्जा मिळून तिचे नामकरण ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’ करण्यात आले. आज NIV ही भारतातील विषाणू संशोधन व निदान क्षेत्रातील आघाडीची संस्था बनली आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह तेलंगणामध्ये स्मार्ट हरित मत्स्यपालन फार्म आणि संशोधन संस्था तसेच अत्याधुनिक री-सर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम (आरएएस) सुविधेचे उद्घाटन करणार

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाचे मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ …