Thursday, December 11 2025 | 02:22:56 AM
Breaking News

ईट राईट स्कूल उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 शाळा प्रमाणित: एफएसएसएआय पश्चिम विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा

Connect us on:

मुंबई, 19 जून 2025. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ईट राईट स्कूल (ERS) उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 सरकारी शाळांना यशस्वी प्रमाणपत्र दिल्याची घोषणा केली. बाल रक्षा भारत यांच्या सहकार्याने आणि मोंडेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पाठींब्याने साकार झालेला हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या समुदायांमध्ये अन्न सुरक्षा, पोषण आणि स्वच्छता शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हा उपक्रम मुंबईतील 50 शाळांमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 शाळांमध्ये राबविण्यात आला. या उपक्रमात प्रात्यक्षिके, क्षमता निर्माण आणि सामुदायिक सहभागाद्वारे सुरक्षित तसेच पौष्टिक अन्न पद्धतींशी संबंधित ज्ञान, दृष्टिकोन आणि वर्तन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.

एफएसएसएआयच्या ‘ईट राईट इंडिया’ या राष्ट्रीय चळवळीचा एक आधारस्तंभ असलेला ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम सामाजिक बदलासाठी उत्प्रेरक म्हणून विद्यार्थ्यांची क्षमता ओळखत त्यांच्यामध्ये अन्न सुरक्षा, पोषण आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अभ्यासक्रम आणि सह-अभ्यासक्रम या दोन्हीमध्ये पोषण शिक्षणाचा समावेश करून विद्यार्थ्यांना लहानपणीच आयुष्यभर निरोगी आहाराच्या सवयी लावण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. कारण अन्नाविषयीच्या पसंती-नापसंती अनेकदा लहानपणीच ठरत असतात.

या उपक्रमांतर्गत मिळालेले मुख्य यश :

1. 100% शाळा नोंदणी आणि प्रमाणपत्र: एफएसएसएआयच्या ईट राईट स्कूल उपक्रमात सर्व 75 शाळांनी सहभाग घेतला आणि प्रमाणन प्राप्त केले.

2. 150 आरोग्य आणि तंदुरुस्ती राजदूत (एचडब्ल्यूए): प्रशिक्षित आणि प्रमाणित शिक्षक आता शाळांमध्ये परिवर्तन घडवणारे म्हणून काम करतात.

3. सेहत क्लबच्या माध्यमातून 34,327 मुलांपर्यंत सुविधा पोहोचल्या : सर्व 75 शाळांमधील 1,476 विद्यार्थी नेतृत्वानी  सहाध्यायांसोबत शैक्षणिक आणि परस्परसंवादी सत्रांचे आयोजन केले.

4.सुरक्षित मध्यान्ह भोजन: एफएसएसएआयच्या FoSTaC प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अन्न हाताळणाऱ्या 120  जणांना प्रशिक्षण देण्यात आले आणि 43 शाळांच्या स्वयंपाकघरांची स्वच्छता आणि सुरक्षिततेची तपासणी पूर्ण करण्यात आली.

5. सामुदायिक स्वयंपाकघर बाग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा शाळांमध्ये बागा आणि मुंबईतील शाळांमधील नाविन्यपूर्ण ‘बॉटल गार्डन’ प्रकल्पातून मुलांना स्थानिक पातळीवर पिकवलेल्या, पौष्टिक अन्नाची ओळख करून देण्यात आली.

6. समावेशक सहभागी परिसंस्था: 4,000 हून अधिक माता तसेच 750 शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षक यांनी पोषण मेळे, पाककृती प्रात्यक्षिके आणि जागरूकता कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

हा महत्त्वाचा टप्पा सहभागी प्रयत्नांची परिणामकारकता आणि लवकर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे अन्न सुरक्षा आणि पोषणात होणाऱ्या सकारात्मक बदलांचे उदाहरण आहे. या यशावर आधारित पुढील टप्प्यात, एफएसएसएआयच्या पश्चिम विभागीय कार्यालय, मुंबईमार्फत मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 200 हून अधिक शाळांना प्रमाणित करण्याची योजना आखत आहे. या विस्ताराचे उद्दिष्ट व्यापक व्याप्ती सुनिश्चित करणे तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या समुदायांमध्ये सुरक्षित, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न पद्धतींची संस्कृती अधिक मजबूत करणे हे आहे.

ईट राईट स्कूल उपक्रम हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. हा उपक्रम शिक्षण व्यवस्थेत शाश्वत अन्न सवयी रुजवून निरोगी भविष्य घडवण्याच्या सरकारच्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे देशभरात अन्न सुरक्षेची एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होतो.

About Matribhumi Samachar

Check Also

कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक यांनी पणजी येथे त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम केला आयोजित

पणजी, 10 डिसेंबर 2025 महाराष्ट्र आणि गोवा येथील कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक (सीसीए) कार्यालयाने 10 डिसेंबर …