मुंबई, 15 जुलै 2025. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय ) मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या भारतीय नागरिक असलेल्या महिलेची तपासणी केली. या तपासणीत अधिकार्यांनी महिलेकडचे ओरिओचे सहा खोके आणि चॉकलेटचे तीन खोके जप्त केले. अधिकार्यांना या सर्व खोक्यांमध्ये पांढऱ्या पावडरने भरलेल्या 300 कॅप्सूल आढळल्या. प्राथमिक तपासणीत कॅप्सूलमधली पांढरी पावडर म्हणजे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे वजन 6261 ग्रॅम असून, अवैध बाजारपेठेत त्याची अंदाजे किंमत सुमारे 62.6 कोटी रुपये इतकी आहे. अमली आणि नशायुक्त पदार्थ (NDPS) अधिनियम, 1985 च्या तरतुदींनुसार अधिकार्यांनी सदर प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केले असून, संबंधित महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे, आणि पुढचा तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालय अंमली पदार्थांची तस्करी रोखणे, अंमली पदार्थांची वाहतूक रोखणे, आणि तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
Matribhumi Samachar Marathi

