मुंबई – संस्कार भारतीच्या वतीने येत्या ३ ऑगस्ट रोजी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ अभ्यासोनी प्रकटावे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने हा सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दिग्दर्शक दत्तात्रेय मायाळू उपाख्य राजदत्त आणि चित्रकार वासुदेव कामत यांच्याशी चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर हे सुसंवाद साधणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत तसेच मालिकाविश्वात दिग्दर्शकीय कर्तृत्वाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे राजदत्त यांना पद्मभूषण(२०२४) पुरस्काराने गौरवण्यात आले. वासुदेव कामत यांनी चित्रकला क्षेत्रात आपली वेगळी शैली निर्माण केली असून त्यांनाही उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्रीने(२०२५) गौरवण्यात आले. हे दोघेही मान्यवर संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले आहेत. या कार्यक्रमात दोन्ही सन्मानित मान्यवरांचे अनुभव, कार्य आणि विचार यावर आधारित विशेष संवाद होणार असून, त्यांच्या कलेतील प्रवासाची प्रेरणादायी झलक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. चित्रपट व चित्रकलेतील अनेक दिग्गज या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. चित्रकला क्षेत्राशी तसेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांनी त्याचप्रमाणे सर्वसामान्य रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष, अभिनेते सुनील बर्वे यांनी केले आहे. कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून https://forms.gle/XLmFn3iCs4j6Lmvz7 या लिंकच्या आधारे नोंदणी करावी असेही संस्कार भारतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी श्रीहरी कुलकर्णी(96191 91983) व संकेत शिंगोटे(86910 68976) यांना संपर्क करावा.
Matribhumi Samachar Marathi

