मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राने (एनएससी) रोसाटॉम आणि एनर्जी ऑफ द फ्युचर यांच्या सहकार्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा दोन दिवसीय उत्सव सायन्स फेस्टिव्हल इंडिया 2025 चे आयोजन 3-4 डिसेंबर 2025 रोजी एनएससी मुंबई येथे केले. प्रत्यक्ष क्रियाकलाप, तल्लीन करणारे शिक्षणानुभव आणि सर्जनशील अन्वेषण यांचे आकर्षक मिश्रण असणारा हा महोत्सव विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबे आणि विज्ञानोत्साही लोकांसाठी आरेखित करण्यात आला होता.
या महोत्सवाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे डीआयवाय अर्थात ‘तुम्ही स्वतः करा’ विज्ञान सत्र, जिथे सहभागींनी सर्वात उंच आणि सर्वात स्थिर टॉवर आरेखित करण्यासाठी तसेच बांधण्यासाठीच्या स्पर्धेत भाग घेतला. यामुळे सर्जनशीलता, अभियांत्रिकी कौशल्ये आणि संघभावना या गुणांना वाव मिळाला. आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे न्यूक्लियर क्वेस्ट – एक परस्परसंवादी बहुआयामी वैज्ञानिक आव्हान, ज्याने सहभागींना अणु संरचना, स्वच्छ ऊर्जा तत्त्वे, आण्विक वाहतूक आणि आर्क्टिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.
संघांनी संकल्पनेवर आधारित चार विभागांमध्ये मुशाफिरी केली, गुण मिळवले आणि वैज्ञानिक कार्यांना चालना देऊन बक्षिसांसाठी स्पर्धा केली. एनपीसीआयएलचे उदय कशेळीकर यांचे “आण्विक मिथकांचा पर्दाफाश” हे व्याख्यान महोत्सवाचे एक आकर्षण होते, त्यांनी परस्परसंवादी प्रात्यक्षिकांद्वारे किरणोत्सर्ग आणि अणु तंत्रज्ञानाचे स्पष्टीकरण दिले. वैज्ञानिक उपक्रमांवरील माहितीपटांचे प्रदर्शन असणारा विज्ञान चित्रपटांचा कोशदेखील अभ्यागतांनी अनुभवला, त्यानंतर जीवन सुलभीकरणातील अणु तंत्रज्ञानाची भूमिका याविषयी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि विज्ञान संवादक डॉ. ए. पी. जयरामन यांनी अर्थपूर्ण माहिती सादर केली.
नेहरू विज्ञान केंद्राने अणुविज्ञानाच्या प्रवासाचा – रुदरफोर्ड आणि क्युरी यांच्या अग्रगण्य योगदानापासून ते ऊर्जा आणि इतर क्षेत्रातील समकालीन अनुप्रयोगांपर्यंतचा – वेध घेणारे एक मूळ विज्ञान नाटक सादर केले. महोत्सवाच्या अद्वितीय आकर्षणांमध्ये भर घालत 100 हून अधिक सहभागींनी एका नेत्रदीपक मानवी “अणु” निर्मितीमध्ये एकत्र येऊन ड्रोन प्रतिमांच्या सहाय्याने गतिमान अणु प्रारूप तयार केले.
सायन्स फेस्टिव्हल इंडिया 2025 या महोत्सवाचे उद्दिष्ट कुतूहल जागृत करणे, वैज्ञानिक साक्षरता बळकट करणे आणि भारत-रशिया वैज्ञानिक सहकार्याच्या चिरस्थायी भावनेचा उत्सव साजरा करणे हे होते. अणु क्षेत्रात दशकांहून अधिक काळापासून सहकार्य करणाऱ्या आणि शांततापूर्ण अणु तंत्रज्ञानात सामायिक प्रगती करणाऱ्या भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन भागीदारीचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम होता. सहयोगी शिक्षण, नवोपक्रम आणि परस्पर वचनबद्धतेद्वारे वैज्ञानिक प्रगती समाजाला कशी लाभदायक ठरत आहे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे, यावर या महोत्सवात प्रकाश टाकण्यात आला.
Matribhumi Samachar Marathi

