नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात संथाली भाषेमधील भारतीय राज्य घटनेचे प्रकाशन केले.
यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. या प्रकाशनामुळे भारतीय राज्यघटना आता ‘ओल चिकी’ लिपी आणि संथाली भाषेत उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संथाली भाषिकांसाठी ही अभिमानाची व आनंदाची बाब आहे, यामुळे आता संथाली भाषिकांना आपल्या स्वतःच्या भाषेत राज्यघटना वाचता येईल व सुलभतेने समजून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
यावर्षी आपण ओल चिकी या लिपीचे शताब्दी वर्षे साजरे करत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. ओल चिकी लिपीच्या शताब्दी वर्षातच भारताची राज्यघटना या लिपीत आणल्याबद्दल त्यांनी केंद्रीय कायदे व न्याय मंत्री तसेच त्यांच्या संघाचे कौतुकही केले.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन तसेच केंद्रीय कायदे व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.
संथाली भाषा ही भारताच्या प्राचीन व अजूनही अस्तित्वात असलेल्या भाषांपैकी एक भाषा आहे. 2003 मधील 92व्या घटनादुरुस्तीअंतर्गत कायद्याद्वारे या भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला होता. झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल तसेच बिहारमधील आदिवासी बांधवांची मोठी लोकसंख्या ही भाषा बोलतात.
Matribhumi Samachar Marathi

