हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटर येथे आज वेदांताच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. उपरोधाची आणि खेदाची गोष्ट म्हणजे, या देशात सनातन आणि हिंदूंचा संदर्भ आकलना पलीकडच्या धक्कादायक प्रतिक्रिया उमटवतो. या शब्दांची खोली, त्याचा गहन अर्थ समजून न घेता, त्यावर कोणताही विचार न करता प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिसते.”
“आपल्या देशातील, या अध्यात्माच्या भूमीतील काही लोक, वेदांत आणि सनातनी ग्रंथांना प्रतिगामी ठरवतात. आणि ते हे सर्व जाणून न घेता, प्रत्यक्ष न पाहता करत आहेत. फार कमी जणांनी त्याचा अभ्यास केला असेल. हा प्रतिरोध अनेकदा विकृत वसाहतवादी मानसिकतेतून, आपल्या बौद्धिक वारशाच्या अपुऱ्या ज्ञानामधून उद्भवतो. हे घटक नियोजनबद्ध आणि भयंकर रीतीने काम करतात. त्यांची कार्यपद्धती घातक आहे. धर्मनिरपेक्षतेच्या विकृत संकल्पनेच्या माध्यमातून ते आपली विध्वंसक विचार पद्धती पुढे नेतात. हे अत्यंत धोकादायक आहे. अशा घृणास्पद कृत्यांना संरक्षण देण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा ढाल म्हणून वापर केला जातो. अशा घटकांचा पर्दाफाश करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे”, असे ते म्हणाले.
आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडले जाण्यावर भर देत उपराष्ट्रपती म्हणाले, “आपल्या सांस्कृतिक मुळांशी घट्ट जोडले जाणे महत्वाचे आहे. आपण आपला तात्विक वारसा जिवंत ठेवायला हवा, कारण आजचे जग एकमेकांशी अधिकाधिक जोडले जात आहे.”
Matribhumi Samachar Marathi

