55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी सशक्त कथा सांगणा-या जगभरातील 15 चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. या वर्षी या स्पर्धेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचे समृद्ध मिश्रण असून प्रत्येक चित्रपट त्याचा अद्वितीय दृष्टीकोन, गाभा आणि कलात्मकतेसाठी निवडला आहे.
यातील प्रत्येक चित्रपट हाँ सर्वोत्कृष्ट जागतिक आणि भारतीय चित्रपटांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. तसेच तो मानवी मूल्ये, संस्कृती आणि कथाकथनाचा अनोखा अनुभव देतो.
या वर्षी वैविध्यपूर्ण संकल्पना आणि शैलीतील चित्रपट पहायला मिळणार आहेत जे आपल्याला अज्ञात प्रदेशात घेऊन जातात, आकलनशक्तीला आव्हान देतात आणि नवीन विषय मांडतात.
ही आहे या उल्लेखनीय नामांकनांची एक झलक :
यावर्षी, प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिष्ठित ‘गोल्डन पीकॉक ज्युरी’मध्ये सिंगापूरचे पुरस्कार विजेते दिग्दर्शक अँथनी चेन, ब्रिटिश-अमेरिकन निर्माती एलिझाबेथ कार्लसेन, स्पॅनिश निर्माते फ्रॅन बोर्जिया आणि प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपट संकलक जिल बिलको यांचा समावेश आहे. हे ज्युरी सदस्य एकत्रितपणे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट कलाकार (महिला) आणि विशेष ज्युरी पारितोषिकांसह विविध श्रेणीतील विजेत्यांची निवड करतील. विजेत्या चित्रपटाला महोत्सवाच्या सर्वोच्च सन्मानासह 40 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
1. फिअर अँड ट्रेंम्बलिंग (इराण)
इराणच्या दोन प्रतिष्ठित महिला चित्रपट निर्मात्या – मनिजेह हेकमत आणि फैझ अजीजखानी यांनी त्यांच्या ‘फिअर अँड ट्रेंम्बलिंग’ चित्रपटात, झपाट्याने बदलणाऱ्या जगात भीती आणि एकाकीपणाने ग्रासलेल्या मंझर या एका वृद्ध स्त्रीची एक मार्मिक कथा सादर केली आहे.
या इराणी चित्रपटाचा यंदाच्या इफ्फी मध्ये वर्ल्ड प्रीमियर आहे. हा चित्रपट सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक परिवर्तन प्रतिबिंबित करतो आणि आधुनिक काळातील इराणमध्ये महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे चित्रण करतो.
2. गुलिझार (तुर्की)
आपल्या पदार्पणाच्या चित्रपटात, तुर्की लेखक-दिग्दर्शिका बेल्किस बायराकने ‘गुलिझार’ या तरुणीच्या जीवनावर भाष्य केले आहे जी तिच्या स्वातंत्र्याच्या शोधात आघात आणि सामाजिक अपेक्षांशी झगडत आहे.
संपूर्ण महोत्सवात लक्ष वेधून घेणाऱ्या या चित्रपटाचा प्रीमियर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 तसेच सॅन सेबॅस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये झाला आहे.
3. होली काऊ (फ्रान्स)
फ्रेंच चित्रपट निर्माते लुईस कुरव्हॉइसियर यांचा पदार्पणातील ‘होली काउ’ हा चित्रपट एक आनंददायी विनोदी नाट्य आहे जे 18 वर्षांच्या टोटोन भोवती फिरते, बेफिकिरीने जगत असताना त्याच्या धाकट्या बहिणीची जबाबदारी त्याच्यावर पडते आणि त्याचे जीवन आमूलाग्र बदलते. या चित्रपटाने कान चित्रपट महोत्सव, 2024 मध्ये प्रतिष्ठित युवा पुरस्कार जिंकला आहे.
पश्चिमी फ्रेंच आल्प्समधील जूका पर्वतीय प्रदेशात चित्रित हा मोहक चित्रपट, वयात येतानाचा गोंधळ आणि मुख्य नायकाला सामोरे जावे लागणाऱ्या प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्यांचे चित्रण करतो.
4. आय एम नेवेन्का (स्पेन)
गोया पुरस्कार विजेते दिग्दर्शक इसिअर बोलेन यांचा ‘आय एम नेवेन्का’ हा चित्रपट समाजाच्या अन्यायाविरुद्ध स्वतःच्या पद्धतीने लढणाऱ्या महिलेची धाडसी कथा आहे. 2024 मध्ये आयोजित सॅन सेबॅस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने यूसकाडी बास्क कंट्री 2030 अजेंडा पुरस्कार जिंकला आहे.
हा चित्रपट पोनफेराडा सिटी कौन्सिलच्या सदस्य असलेल्या नेवेन्का फर्नांडेझच्या केसचे नाट्यमय चित्रण करतो, जी 2001 मध्ये उच्च पदावरील राजकारण्याविरोधात लैंगिक छळाचा खटला जिंकणारी स्पेनमधील पहिली महिला ठरली.
खऱ्या घटनांनी प्रेरित हा चित्रपट न्यायासाठीच्या लढ्याची कथा सांगतो आणि स्पेनमधील छळ आणि लैंगिक समानतेच्या मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांचा शोध घेतो.
5. पॅनोप्टिकॉन (जॉर्जिया-अमेरिका)
जॉर्जियन-अमेरिकन दिग्दर्शक जॉर्ज सिखारुलिड्झचा पदार्पणातील चित्रपट ‘पॅनोप्टिकॉन’ मध्ये, एका लहान जॉर्जियन किशोरवयीन मुलाला त्याच्या जीवनात अस्तित्व, नैतिकता आणि स्वत: ची ओळख या प्रश्नांना सामोरे जावे लागते. या चित्रपटाने कार्लोवी व्हॅरी 2024 मध्ये इक्यूमेनिकल ज्युरी – स्पेशल मेन्शन पुरस्कार जिंकला आहे.
वयात येण्याच्या काळातील कथा सांगणारा हा चित्रपट सोव्हिएत जॉर्जियन समाजात वाढतानाच्या आव्हानांचे चित्रण आहे.
6. पियर्स (सिंगापूर)
सिंगापूरच्या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्या, नेलिशिया लो यांच्या ‘पियर्स’ ला यावर्षी कार्लोवी व्हॅरी आंतरराष्ट्रीय महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
एक मनोवैज्ञानिक थ्रिलर असलेला हा चित्रपट कुटुंब आणि भावंडांमधील चढाओढीतील गुंतागुंतीवर भाष्य करतो. स्पर्धात्मक तलवारबाजीच्या जगात चित्रित हा चित्रपट दोन भावांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेमध्ये संतुलन राखण्यातील संघर्षाचा मागोवा घेतो.
7. रेड पाथ (ट्युनिशिया)
ट्युनिशियन थिएटर आणि सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता लोटफी अचौर यांचा ‘रेड पाथ’ हा नवीन चित्रपट आचराफ या तरुण मेंढपाळाची गोष्ट आहे. त्याला या प्रवासात आघात, परंपरा आणि वैयक्तिक नुकसान यातून जावे लागते. 2024 मध्ये प्रतिष्ठित लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर झाला.
8. शेफर्ड्स (कॅनडा-फ्रान्स)
नवीन क्यूबेक सिनेमाच्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांपैकी एक, सोफी डेरास्पियाचा ‘शेफर्ड्स’ हा आत्मशोध आणि ग्रामीण जीवनातील कठोर वास्तवांचे चित्रण आहे.
या चित्रपटाने टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट कॅनेडियन चित्रपट पुरस्कार जिंकला आहे.
हा चित्रपट एका कॅनेडियन कॉपीरायटरची कथा आहे जो मनःशांती मिळवण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी मेंढपाळ म्हणून जीवन जगण्यासाठी फ्रेंच आल्प्सकडे जातो.मात्र त्याला त्याच्या नवीन जीवनात एकाकीपणा आणि त्रासाला सामोरे जावे लागते. डेरास्पेचे उत्कृष्ट दिग्दर्शन दर्शकांना मानवी लवचिकता आणि कणखरपणा यांचा शोध घेण्यास भाग पाडते.
9. द न्यू इयर दॅट नेव्हर केम (रोमानिया)
पुरस्कार-विजेता रोमानियन लेखक आणि दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांचा ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ हा रोमानियाच्या 1989 च्या क्रांतीदरम्यान सहा व्यक्तींच्या जीवनाचा प्रवास प्रेक्षकांना घडवतो. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ओरिझोन्टी पुरस्कार आणि व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2024 मध्ये विशेष उल्लेख म्हणून 40 वर्षाखालील लेखकाचा पुरस्कार मिळाला.
मनस्वी वैयक्तिक कथेसह ऐतिहासिक नाट्य असलेला मुरेसानुचा हा चित्रपट राजकीय उलथापालथ आणि प्रतिकार, नुकसान आणि आशेच्या मानवी कथांची एकत्र सांगड घालतो.
10. टॉक्सिक (लिथुआनिया)
आपल्या पहिल्या चित्रपटात, लिथुआनियन चित्रपट निर्माती आणि पटकथालेखक सॉले ब्लियुवेतेने विखारीपणा दरम्यान मैत्रीची कच्ची आणि क्लेशदायी कथा सादर केली आहे.
‘टॉक्सिक’ किशोरावस्था, मैत्री आणि आत्म-नाश यातील गुंतागुंतीचा शोध घेतो, त्याचबरोबर चित्रपट निर्मात्याने तरुणपणाच्या गडद बाजूचा शोध घेतला आहे. भावनिक गोंधळ आणि वाढत्या वयाच्या दबावाच्या चित्रणाबद्दल त्याने समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे .
या चित्रपटाने 77 व्या लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2024 मध्ये गोल्डन लेपर्ड, स्वॅच फर्स्ट फीचर अवॉर्ड आणि इक्यूमेनिकल ज्युरी पुरस्कार जिंकला आहे.
11. वेव्ह्ज (झेक प्रजासत्ताक)
झेक अभिनेता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक जिरी मॅडलचा ‘वेव्ह्ज’ हा तिसरा चित्रपट आहे आणि 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी झेक प्रजासत्ताकची अधिकृत प्रवेशिका म्हणून त्याची निवड झाली आहे.
हा चित्रपट 1968 मधील झेकोस्लोव्हाकियावरील सोव्हिएत आक्रमणादरम्यानचे एक शक्तिशाली ऐतिहासिक नाट्य आहे. हा चित्रपट पत्रकारांच्या एका गटाभोवती फिरतो जे त्यांच्या देशाचे स्वातंत्र्य धोक्यात असल्यामुळे सत्याची बाजू मांडण्यासाठी सर्व प्रकारचा धोका पत्करतात.
12. हू डू आय बिलॉन्ग टू (ट्युनिशिया-कॅनडा)
‘हू डू आय बिलॉन्ग टू’ हा प्रसिद्ध ट्युनिशियन-कॅनेडियन चित्रपट निर्माते मरियम जूबेरचा पहिला चित्रपट आहे. हे एका विभक्त कुटुंबाबद्दल उच्च दर्जाचे मात्र मार्मिक नाट्य आहे. हा चित्रपट एका ट्युनिशियन महिलेची कथा सांगतो, जी तिच्या मातृप्रेम आणि सत्याच्या शोधात अडकते जेव्हा तिचा मुलगा युद्धातून घरी परततो आणि त्यांच्या गावात अंधार पसरवतो.
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2024 मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला.
चित्रपटात मातृप्रेम आणि वैयक्तिक त्यागाची गुंतागुंतीची कथा आहे. जूबेरच्या कौशल्याने त्याचा भावनिक दृष्टिकोन आणि उत्तम कामगिरीची आधीच प्रशंसा मिळविली आहे.
13. द गोट लाईफ (भारत)
‘द गोट लाइफ’ मध्ये, राष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम चित्रपट दिग्दर्शक ब्लेसी यांनी सौदी अरेबियाच्या रुक्ष वाळवंटात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय स्थलांतरित कामगाराची सत्यकथा मांडली आहे.
हा चित्रपट बेन्यामीन या लेखकाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या मल्याळम कादंबरी आदुजीविथमचे रूपांतर आहे, जो आखाती भागातील मल्याळी स्थलांतरित मजूर नजीबच्या वास्तविक जीवनाच्या कथेवर आधारित आहे.
हा नाट्यमय चित्रपट स्थलांतर, जगण्याचा संघर्ष आणि जीवनातील प्रतिकूल स्थितीत मानवी भावना या विषयांचा शोध घेतो.
14. आर्टिकल 370 (भारत)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल 370’ हा भारताच्या अतिक्षुब्ध घटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर चित्रित एक तणावपूर्ण राजकीय थरारपट आहे.
जम्मू आणि काश्मीरला विशेष स्वायत्तता देणाऱ्या कलम 370 च्या गुंतागुंतीविषयी ही कथा खोलवर विश्लेषण करते. या चित्रपटाने या प्रदेशातील सामाजिक-राजकीय परिदृश्य उत्कृष्टरित्या मांडले आहे. चित्रपटात शक्ती आणि वैयक्तिक बलिदानाच्या संघर्षाची कथा दिग्दर्शकाने कुशलतेने गुंफली आहे.
15. रावसाहेब (भारत)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपटदिग्दर्शक निखिल महाजन द्वारा दिग्दर्शित ‘रावसाहेब’ हा बहुप्रतिक्षित मराठी क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यंदाच्या इफ्फीमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर आहे. निखिल महाजनचा क्राइम थ्रिलर आदिवासी जमिनींवरील मनुष्य-प्राणी संघर्ष आणि न्यायाच्या शोधावर केंद्रीत आहे. हा चित्रपट भारतातील आदिवासी भूमीमध्ये चित्रित एक उत्कंठावर्धक कथा आहे.
सिनेमातील महिलांच्या कामगिरीचा उत्सव
उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षीची नामांकनं ही महिला चित्रपट दिग्दर्शिकांना एक प्रकारची मानवंदना आहे कारण, योगायोगाने, 15 पैकी 9 चित्रपट प्रतिभावान महिला चित्रपट दिग्दर्शिकांनी दिग्दर्शित केले आहेत.
आजच तुमच्या तारखा निश्चित करा.
तुमचा कुणाला पाठिंबा आहे ?
आणि तुम्ही तुमची पसंती निवडली आहे का ?
या नोव्हेंबरमध्ये आमच्या इफ्फीमध्ये सहभागी व्हा आणि हे रंजक चित्रपट पाहण्याची संधी मिळवा जे प्रतिष्ठित गोल्डन पीकॉकसाठी स्पर्धेत आहेत.