राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 नोव्हेंबर, 2024) तामिळनाडूच्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात विद्यार्थी अधिकारी आणि प्राध्यापकांना संबोधित केले.
संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाने भारताच्या सशस्त्र दलांमधील संभाव्य अधिकाऱ्यांना तसेच मित्र देशांच्या संभाव्य अधिकाऱ्यांना आणि निवडक नागरी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यामध्ये भरीव योगदान दिले असल्याचे सांगून राष्ट्रपतींनी महाविद्यालयाच्या आजवरच्या कार्याची प्रशंसा केली. गेल्या सात दशकांमध्ये मधल्या स्तरावरील अधिकाऱ्यांना व्यावसायिक दृष्ट्या घडवण्यात या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्या. विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा मिळून एकत्रित बहुसेवा आणि बहुराष्ट्रीय गट असण्यासोबतच, तज्ञतेच्या पातळीवरील उत्कृष्ट प्राध्यापकांची उपलब्धता अशा प्रकारचा वैशिष्टपूर्ण गौरवास्पद वारसा या संस्थेने जपला असल्याचेही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
भारतीय सशस्त्र दलांचा सर्वत्र आदरच होतो. आपल्या देशाच्या सीमा आणि प्रादेशिक अखंडतेचे अहोरात्र रक्षण करण्यात ते कायमच आघाडीवर असतात. त्यांनी कायमच आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण केले आहे, त्याबद्दल देशाला आपल्या संरक्षण दलांचा प्रचंड अभिमान आहे अशी भावनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केली. संरक्षण दलांमधील आपले कर्मचारी कायम राष्ट्र प्रथम या भावनेनेच सेवा देत आले आहेत, आणि त्यासाठी ते कौतुकाला पात्र आहेत, अशा शब्दांत संरक्षण दलाचा गौरवही राष्ट्रपतींनी केला.
आजच्या काळात संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांमध्ये महिला अधिकारी विविध तुकड्यांचे नेतृत्व करत आहेत, याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
सध्या भारत वेगाने प्रगती करतो आहे, आणि संरक्षणासह विविध क्षेत्रांमधली आपल्या प्रगतीची दखल जग घेते आहे असे त्यांनी सांगितले. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यादृष्टीने सशस्त्र दलांना सज्ज ठेवता यावे याकरता भारत स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. सद्यस्थितीत आपला देश संरक्षण उत्पादनांचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येऊ लागले आहे, आणि त्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार आणि मोठा संरक्षण निर्यातदार होण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.
सध्या जगभरातील भूराजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे, अशा काळात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल ही गरजही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केली. आपल्याला केवळ आपले राष्ट्रीय हित जपायचे नाही तर, त्याला समांतरपणे सायबर युद्ध आणि दहशतवाद या आणि अशा प्रकारच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरच्या नव्या आव्हानांचा सामना करण्याची तयारीही आफल्याला करावी लागेल ही बाबही राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनात नमूद केली. संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील हा अभ्यासक्रम विद्यार्थी अधिकाऱ्यांना, मोठ्या पातळीवरील जबाबदाऱ्यांच्या बाबतीत आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाऊ शकण्याच्या बाबतीत निष्णात रणनीतीकार म्हणून तयार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.