लॉजिस्टिक्स क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी उद्योगजगताने सरकारी डिजिटल मंचांमध्ये 100 टक्के सहयोग साधणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज यु एल आय पी लॉजिस्टिक्स हॅकेथॉन 2.0 पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.उद्योजकांनी शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेत हरित अर्थात पर्यावरणाशी सुसंगत पद्धतींचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एकंदरीतच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने आणि शाश्वतता आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक मोबिलिटी, जैवइंधन, बहुपर्यायी वाहतूक साधने अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
पायाभूत सेवा सुविधांच्या निर्मितीमध्ये नवोन्मेष अतिशय आवश्यक असून उत्कृष्ट रस्ते बांधणी तंत्रज्ञान, निविदा देण्यासाठी जलद प्रक्रिया यांची सध्या नितांत गरज आहे.कृत्रिम बुद्धिमता आणि डेटा विश्लेषण यांच्या मदतीने आपण वेळ वाचवू शकतो तसेच खर्च देखील आटोक्यात ठेवू शकतो, असे गोयल यांनी सांगितले.
देशातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हॅकेथॉन हे शासनाच्या नवीन शैलीचे मॉडेल आहे, असे ते म्हणाले.
नीती आयोग आणि स्टार्ट-अप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 24 सप्टेंबर 2024 रोजी यु एल आय पी लॉजिस्टिक्स हॅकेथॉन 2.0 चा अधिकृत प्रारंभ झाला.लॉजिस्टिक्स क्षेत्रातील गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी स्टार्ट-अप, उद्योगजगत आणि लॉजिस्टिक सेवा प्रदात्यांना देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा यामागे उद्देश आहे.
2024 च्या आवृत्तीत हॅकेथॉनची रूपरेषा मोठ्या प्रमाणावर आखण्यात आली असून 4,751 पेक्षा अधिक जणांनी नोंदणी करून या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला आहे.अतिशय काटेकोर आणि अवघड अशा मूल्यांकन प्रक्रियेनंतर प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी 72 सहभागींची निवड करण्यात आली. 20 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या अंतिम फेरीत यापैकी 25 अंतिम स्पर्धकांनी त्यांचे नाविन्यपूर्ण उपाय सादर केले.
यापैकी कित्येक उपायांमध्ये शाश्वत पुरवठा साखळी व्यवस्थापनावर भर देण्यात आला तसेच हरित लॉजिस्टिक परिचालनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यक्षम लोड एकत्रीकरण,योग्य राउटिंग आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगद्वारे कमी कार्बनउत्सर्जन या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले.
याशिवाय सहभागींनी दळणवळण क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार एकसंध आणि किफायतशीर विमा यंत्रणा आणि प्रगत जोखीम मूल्यांकन साधने, यांची सांगड घालून एकत्रित मालवाहू अर्थात कार्गो विमा आणि जोखीम व्यवस्थापनातील नवकल्पना सादर केल्या. अंदाजात्मक विश्लेषणे आणि डेटा-चालित निर्णय यांच्या संयोगाने सर्वात कार्यक्षम मार्ग शोधणे, मालवाहतुकीसाठी जागेचा पुरेपूर वापर आणि वाहतुकीच्या वेळेत कपात करण्याच्या उद्देशाने नवनवीन उपायांसह परिचालन कार्यक्षमता वाढवणे हे आणखी एक प्रमुख उद्दिष्ट दिसून आले
या हॅकेथॉनमध्ये डिजिटल परिवर्तनावर केंद्रीत असलेले प्रस्ताव देखील मांडले गेले. ज्यामध्ये प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी युनिफाइड डॉक्युमेंटेशन सिस्टम सादर करणे, अनुपालन सुनिश्चित करणे आणि भागधारकांमध्ये रीअल-टाइम डेटा देवाणघेवाण सुलभ करणे अशा गोष्टींचा समावेश होता. याव्यतिरिक्त, चालक आणि वाहन परिसंस्थेशी निगडित अनेक नवकल्पना मांडण्यात आल्या.वाहनचालकांचे प्रमाणीकरण, वाहन आरोग्य निरीक्षण आणि लोड ऑप्टिमायझेशनसाठी अनेक साधनांविषयी माहिती सांगण्यात आली, यामुळे लहान प्रमाणावरील परिचालन सेवाप्रदात्यांना किफायतशीर आणि योग्य तंत्रज्ञानाचा लाभ होईल.
हॅकेथॉनमध्ये लॉजिस्टिक क्षेत्रातील नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचा गौरव करण्याच्या उद्देशाने एकूण 20 लाख रुपयांची भरीव बक्षीसे ठेवण्यात आली.
Matribhumi Samachar Marathi

