गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी, 11 डिसेंबर रोजी, गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत आयोजित, विद्युत आणि विद्युत अभियांत्रिकी संस्थेच्या वीज, उर्जा आणि नियंत्रणासाठी स्मार्ट तंत्रज्ञान या विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. 13 डिसेंबर परिषद चालणार आहे.
या वेळी प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या भविष्याला पुढची दिशा दाखवण्यासाठी, शैक्षणिक, औद्योगिक आणि संशोधन क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणल्याबद्दल त्यांनी संस्थेची प्रशंसा केली.राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड अभियान, राष्ट्रीय स्मार्ट मीटर कार्यक्रम, सुधारित वितरण क्षेत्र योजना आणि स्मार्ट-ग्रीड विषयक विविध प्रायोगिक प्रकल्पांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांद्वारे देशात वीज सुविधेची उपलब्धता वाढवणे, वीज वितरणाला बळकटी देणे, आणि नवीकरणीय ऊर्जा एकात्मतेचा विस्तार करणे या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखीत केली. केंद्र सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे ऊर्जा क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि देशभरातील उर्जा पुरवठा व्यवस्थेची विश्वासार्हता सुधारण्याच्या बाबतीत एक मजबूत पाया रचला गेला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि स्टार्टअप्सनी भारतीय परिस्थितीला अनुकूल असलेल्या उपाययोजनांचा विस्तार करावा असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले. यासोबतच शैक्षणिक संस्थांनी प्रयोगशाळांमधून वास्तविक जगात अवलंबता येऊ शकतील अशा अनुकरणीय संशोधनांना गती द्यावी असेही ते म्हणाले. त्याअनुषंगानेच ही परिषद महत्वाची असल्याचे ते म्हणाले. या परिषदेच्या निमित्ताने चार दिवस होणारी चर्चा राज्यासह आणि संपूर्ण देशाकरता महत्त्वाचे योगदान देणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्राध्यापक ओमप्रकाश जयस्वाल यांनीही उपस्थितांनी संवाद साधला. जगभरातील तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक स्मार्ट वीज आणि स्मार्ट उर्जा या विषयावर विचारमंथन करण्यासाठी एकत्र आले आहेत, अशा उच्च दर्जाच्या परिषदेचे आयोजन, केवळ 15 वर्षे जुनी असलेली संस्थेने केले असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष बी. राजा गोपाल नायडू हे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. एनटीयुएसटी, तैवान इथून प्राध्यापक हुआंग-जेन चिउ आणि प्राध्यापक प्रद्युम्न चतुर्वेदी व्हीएनआयटी, नागपूर हे वीज, उर्जा आणि नियंत्रणासाठी स्मार्ट तंत्रज्ञान 2025 चे अध्यक्ष तर डॉ. सुरेश मिकिली उपाध्यक्ष (राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोवा),इतर मान्यवर, निमंत्रित वक्ते, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी आणि इतर सहभागी यावेळी उपस्थित होते.
विद्युत आणि विद्युत अभियांत्रिकी संस्था ही मानवतेच्या हितासाठी तंत्रज्ञानात प्रगती साध्य करण्याला समर्पित असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तांत्रिक व्यावसायिक संस्थांपैकी एक आहे. STPEC ही मुंबईतील विद्युत आणि विद्युत अभियांत्रिकी संस्थेद्वारा आयोजित केली जाणारी अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषद आहे.
यापूर्वी 2020 मध्ये नागपूरमधील विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, 2021 मध्ये बिलासपूरमधील छत्रपती शिवाजी तंत्रज्ञान संस्था आणि 2023 मध्ये भुवनेश्वरमधील कलिंग औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेत या परिषदेच्या तीन आवृत्त्या पार पडल्या होत्या. आता गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत होत असलेल्या परिषदेच्या यंदाच्या आवृत्तीत सादर झालेले सर्व शोधनिबंध विद्युत आणि विद्युत अभियांत्रिकी संस्थेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करण्याच्या अधीन राहून, संभाव्य प्रकाशनासाठी विद्युत आणि विद्युत अभियांत्रिकी संस्थेच्या Xplore विभागाकडे सादर केले जाणार आहेत.
Matribhumi Samachar Marathi

