Thursday, December 25 2025 | 05:22:45 AM
Breaking News

विजय दिवस: 1971 च्या युद्धात भारताचा ऐतिहासिक विजय सुनिश्चित करणाऱ्या शूरवीरांना राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली देशाने वाहिली आदरांजली

Connect us on:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. भारताने 1971 च्या युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करत आपला देश आज, 16 डिसेंबर 2025 रोजी, विजय दिवस साजरा करत आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, ज्यांचे शौर्य, निष्ठा आणि देशभक्ती नेहमीच देशाला गौरव प्राप्त करून देत आले आहेत आणि जे प्रत्येक नागरिकाला यापुढेही प्रेरित करत राहतील, त्या धाडसी वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्या संदेशात राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की भारतीय सशस्त्र दलांचा ‘स्वदेशीकरणाद्वारे सक्षमीकरण’ हा उपक्रम भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्याप्रती त्यांच्या बांधिलकीचे दर्शन घडवतो. “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आपल्या सशस्त्र दलांनी स्वावलंबन, धोरणात्मक निर्धार आणि आधुनिक युध्द तंत्रांचा परिणामकारक वापर करत  केलेले प्रदर्शन संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक ठरले आहे,” असे त्या म्हणाल्या.

विजय दिवसानिमित्त राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात परम वीर दीर्घाचे उद्घाटन केले. या दालनात आतापर्यंत परमवीरचक्र (पीव्हीसी) मिळालेल्या सर्व 21 विजेत्यांची तैलचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. देशाचे रक्षण करताना अदम्य भावनेचे दर्शन घडवणाऱ्या राष्ट्रीय नायकांची माहिती अभ्यागतांना करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राष्ट्रपतींनी या प्रसंगी पीव्हीसी विजेते तसेच त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा देखील गौरव केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी देखील एक्स मंचावर संदेश पाठवून शूर वीरांना आदरांजली वाहिली . ते म्हणाले की 1971च्या युद्धाने न्याय तसेच स्वातंत्र्याप्रती भारताच्या बांधिलकीला दुजोरा दिला आणि तिन्ही सैन्यदलांच्या अतुलनीय व्यावसायिकतेचे दर्शन घडवले.

1971 मध्ये ज्या शूर सैनिकांचे धैर्य आणि बलिदानाने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, त्यांचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले: “त्यांचा दृढ निश्चय आणि निःस्वार्थ सेवेने आपल्या देशाचे रक्षण केले आणि आपल्या इतिहासात अभिमानाचा क्षण कोरला गेला. हा दिवस त्यांच्या शौर्याला सलाम करतो, आणि त्या असामान्य वीरांचे स्मरण करून देतो. त्यांची शौर्यगाथा भारतीयांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि देशाच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर वीरांना आदरांजली वाहिली.

“1971 चा निर्णायक विजय मिळवून देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांपुढे देश अभिमानाने आणि कृतज्ञतेने नतमस्तक आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अचूक समन्वयाने काम केले आणि इतिहासाला नवा आयाम दिला आणि भारताचा धोरणात्मक निर्धार अधोरेखित केला. त्यांचे शौर्य, शिस्त आणि लढाऊ बाणा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि आपली राष्ट्रीय इच्छाशक्ती बळकट करत राहील.” राजनाथ सिंह यांनी एक्सवर म्हटले आहे.

या समारंभात संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनीही शूरवीरांना आदरांजली वाहिली. या वीरांच्या शौर्यगाथा प्रत्येक भारतीयाला  पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहतील, असे ते म्हणाले.

संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी.सिंह, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन यांनीही राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीरांना आदरांजली वाहिली.

About Matribhumi Samachar

Check Also

नवी दिल्लीत कृत्रिम बुद्धीमत्ता उत्क्रांतीवरील राष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ …