गंभीर स्वरूपाच्या फसवणुकीचा तपास करणाऱ्या कार्यालयाने (एसएफआयओ ) हिरो इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, बेनलिंग इंडिया एनर्जी अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि ओकिनावा ऑटोटेक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या तीन कंपन्यांमध्ये शोध मोहीम राबवली.
केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएएमई ) II योजनेअंतर्गत या तिन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे 297 कोटी रुपयांचे अनुदान फसवणूक करून मिळवल्याचे समोर आले आहे.
भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 2019 मध्ये फेम II योजना सुरू करण्यात आली होती. फेम -II योजना आणि चरणबद्ध विनिर्माण कार्यक्रम (पीएमपी) मार्गदर्शक तत्वांमध्ये या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र होण्यासाठी भारतात वाहनांच्या काही प्रमुख घटकांचे उत्पादन निर्धारित केले आहे. अनुदानाचा दावा करण्यासाठी तिन्ही कंपन्यांनी अवजड उद्योग मंत्रालयासाठी लागू मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याचे फसवणुकीद्वारे दाखवले होते, जे नंतर चुकीचे आणि खोटे असल्याचे आढळून आले.
एसएफआयओद्वारे तपास केल्यावर उघड झाले की पीएमपी मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत अनेक प्रतिबंधित भाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चीनमधून आयात करण्यात आले होते आणि परिणामी फेम – II अंतर्गत पीएमपी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले.
शोध मोहिमेदरम्यान डिजिटल डेटा, पुस्तके आणि इतर साहित्य यांसारखे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
पुढील तपास सुरू आहे.