केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसएचडी(डी)]या संस्थेने सक्षमीकरणाच्या विविध कार्यक्रमांसह आंतरराष्ट्रीय दिव्यांगदिन साजरा केला. या कार्यक्रमांमध्ये दिव्यांगजनांची उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करण्यात आली.
“सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांगजनांच्या नेतृत्वाला चालना देणे” ही यंदाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून एवायजेएनआयएसएचडी (डी) ने सहा वर्षांखालील दिव्यांग मुलांसाठी क्रीडा मेळाव्याचे आयोजन केले. बालवयापासूनच प्रतिभेची जडणघडण करणे आणि समावेशकतेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
इंग्लिश खाडी पार करणारी सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा-जलतरणपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिया राय या स्वमग्नता (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) असलेल्या 16 वर्षांच्या मुलीने या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सोसायटी फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ द डेफ-ब्लाइंड (एसईडीबी) चे संचालक जमीर ढाले आणि आमदार ऍड. आशिष शेलार सन्माननीय पाहुणे म्हणून या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
आपल्या भाषणात ऍड. आशिष शेलार यांनी पंतप्रधानांच्या “सबका साथ, सबका विकास” या संकल्पनेला अनुसरून दिव्यांगजनांच्या क्षमता ओळखून त्यांचा उपयोग करून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला. समाजाच्या सक्षमीकरणासाठी एवायजेएनआयएसएचडी (डी) ने केलेल्या समर्पणाची त्यांनी प्रशंसा केली तसेच कर्णबधिर-अंधांसाठी कौशल्य विकासासाठी केलेल्या पुरोगामी कार्याबद्दल जमीर ढाले यांची प्रशंसा केली.
कार्यक्रमात ‘समावेशक वॉकेथॉन’ आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये दिव्यांगजन , कर्मचारी, विद्यार्थी, कुटुंबे आणि समुदाय सदस्यांसह 150 हून अधिक जण सहभागी झाले होते. एवायजेएनआयएसएचडी (डी)येथे सुरू झालेल्या आणि हिल रोड, वांद्रे पश्चिमेकडे निघालेल्या वॉकेथॉनने सुगम्यता आणि समावेशकतेबाबत जनजागृती केली. या व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी सक्षमीकरणासाठी भारतीय सांकेतिक भाषा शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वांद्रे पश्चिम पोलीस ठाणे येथे ‘नुक्कड नाटक’ हे रंजक पथनाट्य सादर केले.