सोमवार, दिसंबर 23 2024 | 08:11:51 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उत्तराखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उत्तराखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

Follow us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि आजपासून उत्तराखंड राज्याच्या स्थापनेचे  रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु होत असल्याचे नमूद केले.

उत्तराखंड त्याच्या स्थापनेच्या 25 व्या वर्षात प्रवेश करत आहे असे नमूद करत  मोदी यांनी तेथील जनतेला राज्याच्या आगामी 25 वर्षांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की उत्तराखंडचा पुढील  25 वर्षांचा हा प्रवास हा एक मोठा योगायोग आहे  कारण भारताने  देखील आपल्या अमृत कालच्या 25 वर्षांचा प्रवास सुरु केला असून त्यात   विकसित भारतासाठी विकसित उत्तराखंड अंतर्भूत आहे. या काळात संकल्प सिद्धीला जाताना देश पाहील असे ते म्हणाले. आगामी 25 वर्षांसाठी जनतेने संकल्पांसह विविध  कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्तराखंडचा अभिमान सर्वदूर जाईल आणि विकसित उत्तराखंडचे उद्दिष्ट राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल असे ते म्हणाले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी आणि हा महत्त्वपूर्ण संकल्प स्वीकारल्याबद्दल मोदी यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. नुकतेच पार पडलेल्या  ‘प्रवासी उत्तराखंड संमेलना’च्या यशस्वी आयोजनाचा त्यांनी उल्लेख केला आणि उत्तराखंडच्या विकासात उत्तराखंडचे अनिवासी  लोक महत्त्वाची भूमिका बजावतील अशी आशा व्यक्त केली.

अटलजींच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या जनतेचे स्वतंत्र राज्य निर्मितीचे प्रयत्न फळाला आले असे  नमूद करून आज स्वप्ने आणि आकांक्षा साकार होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. विद्यमान सरकार उत्तराखंडच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सध्याचे दशक हे उत्तराखंडचे आहे आणि गेल्या काही वर्षांत त्यांचा हा विश्वास सिद्ध झाला आहे याचा  पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. उत्तराखंड विकासाचे नवे विक्रम रचत आहे आणि नवनवीन टप्पे गाठत असल्याचे  अधोरेखित करत  पंतप्रधानांनी सांगितले की शाश्वत विकास उद्दिष्ट  निर्देशांकात राज्याने पहिले स्थान पटकावले आहे. ते पुढे म्हणाले की, उत्तराखंडला ‘व्यवसाय सुलभता ’ श्रेणीमध्ये ‘अचिव्हर्स’ आणि स्टार्टअप श्रेणीमध्ये ‘लीडर्स ’ म्हणून स्थान देण्यात आले आहे.

ते म्हणाले की राज्याचा विकास दर 1.25 पटीने  वाढला आहे आणि जीएसटी संकलन 14 टक्क्यांनी वाढले आहे, दरडोई उत्पन्न 2014 मधील 1.25 लाख रुपयांवरून वार्षिक 2.60 लाख रुपये झाले आहे तर  सकल देशांतर्गत उत्पादन 2014 मधील 1 लाख 50 हजार कोटी रुपयांवरून वाढून आज अंदाजे 3 लाख 50 हजार कोटी रुपये आहे. ते म्हणाले की, ही आकडेवारी युवकांसाठी आणि औद्योगिक वाढीसाठी  नवीन संधी तसेच महिला आणि  मुलांचे जीवन सुखकर बनवण्याचे स्पष्ट संकेत आहे.  2014 मध्ये 5 टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता त्याची व्याप्ती आज 96 टक्क्यांहून अधिक झाली आहे आणि ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम 6,000 किमीवरून 20,000 किमीपर्यंत वाढले आहे अशी माहिती त्यांनी दिली. लाखो शौचालयांचे बांधकाम,  वीजपुरवठा, गॅस जोडणी , आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचार यांचाही त्यांनी उल्लेख  केला आणि सरकार समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

उत्तराखंड राज्याला केंद्राकडून देण्यात आलेले अनुदान जवळपास दुपटीने वाढले आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. एम्स उप केंद्राची  स्थापना, ड्रोन ऍप्लिकेशन संशोधन केंद्र  आणि उधमसिंग नगरमध्ये छोट्या  औद्योगिक टाउनशिपची स्थापना यांचाही त्यांनी उल्लेख केला.  केंद्र सरकारचे  2 लाख कोटी रुपयांचे विकास प्रकल्प राज्यात आधीच सुरू असून संपर्क व्यवस्था सुधारणारे  प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत यावर त्यांनी भर दिला. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की उत्तराखंडमधील 11 रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित केली जात आहेत आणि एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते डेहराडून दरम्यानचा प्रवासाचा वेळ 2.5 तासांपर्यंत कमी होईल. विकासामुळे स्थलांतरालाही आळा  बसला आहे असे ते म्हणाले.

विकासाकामांसोबतच देशाच्या वारशाचे जतन करण्याच्या कामही सरकार समांतरपणे करत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखीत केली. भव्य आणि दिव्य केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच  बद्रीनाथ धाममध्येही वेगाने विकासकामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. मानसखंड मंदिर मिशन माला योजनेच्या पहिल्या टप्प्यात 16 प्राचीन मंदिरांचा विकास केला जात आहे. बारमाही रस्त्यांच्या बांधणी मुळे धाम यात्रा करणे आता सुलभ झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पर्वत माला योजनेअंतर्गत धार्मिक आणि पर्यटनस्थळे रोपवेच्या माध्यमातून जोडली जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. सरकारने माना या गावातून ‘व्हायब्रंट व्हिलेज’ या योजनेची सुरुवात केली असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या नेतृत्वातील सरकार हे सीमावर्ती भागांतील गावांना देशातली पहिली प्राधान्याची गावे मानते ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखीत केली. व्हायब्रंट व्हिलेज या योजनेअंतर्गत २५ गावांचा विकास केला जात आहे., सरकारच्या या प्रकारच्या प्रयत्नांमुळे उत्तराखंडमधील पर्यटनाशी संबंधित संधी वाढल्या आहे,  उत्तराखंडमधील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देखील वाढल्या आहेत असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अहवालाचाही दाखला दिला. या अहवालानुसार चालू वर्षात वर्षात 6 कोटी पर्यटक आणि यात्रेकरूंनी उत्तराखंडला भेट दिली आहे. गेल्या वर्षी 54 लाख भाविकांनी चारधामला भेट दिली, तर 2014 पूर्वी 24 लाख भाविकांनी चारधामला भेट दिली अशी माहिती त्यांनी दिली. यात्रेकरुंच्या या वाढलेल्या संख्येचा लाभ स्थानिक हॉटेल, पर्यटकांसाठी घरगुती विसाव्याची ठिकाणे, ट्रान्सपोर्ट एजंट, खाजगी वाहन चालक अशा प्रत्येक घटकाला झाला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत पाच हजारांपेक्षा जास्त पर्यटकांसाठी घरगुती विसाव्याची ठिकाणांची नोंदणी झाली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

उत्तराखंडसाठी घेतलेले निर्णय आणि आखलेली धोरणे म्हणजे देशासमोर आदर्श उदाहरण निर्माण करणारी कामे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली.

संपूर्ण देशात इथल्या समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीविषयी चर्चा होत आहे, यासोबतच तरुणांच्या संरक्षणासाठी बनावटीं विरोधी केलेल्या  कायद्याचीही चर्चा होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. उत्तराखंडमध्ये भरती प्रक्रिया पूर्णतः  पारदर्शक पद्धतीने होत असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.

यावेळी पंतप्रधानांनी नागरिकांसाठीच्या नऊ विनंत्याही श्रोत्यांसमोर मांडल्या. यांपैकी पाच विनंत्या या उत्तराखंडमधील नागरिकांसाठी होत्या, तर राज्याला भेट देणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांना उद्देशून त्यांनी चार विनंत्या केल्या. पहिल्या विनंती अंतर्गत  गरवाली, कुमाऊनी आणि जौनसरी या भाषांच्या संवर्धनावरही त्यांनी आपल्या संबोधनातून भर दिला आणि राज्यातील जनतेने भावी पिढ्यांना या भाषा शिकवाव्यात असे कळकळीचे आवाहनही केले. दुसरी विनंती म्हणून हवामान बदलामुळे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘एक पेड मां के नाम’ या मोहीमेला पुढे नेण्याचं आवाहनही त्यांनी श्रोत्यांना केले. तिसरी विनंती म्हणून जलस्त्रोतांचे संवर्धन आणि जल स्वच्छतेशी संबंधित नव्या मोहिमा राबवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. चौथ्या विनंती अंतर्गत त्यांनी नागरिकांनी मुळाशी जोडले जावे आणि आपापल्या गावांना भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पाचव्या विनंती पोटी राज्यातील पारंपरिक घरांच्या संवर्धनावर त्यांनी भर दिला आणि या घरांचे यात्रेकरू आणि पर्यटकांसाठीच्या घरगुती स्वरुपाच्या विसावा ठिकांणांमध्ये रूपांतर करावे अशी सूचनाही त्यांनी नागरिकांना केली.

राज्याला भेट देणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांनाही चार विनंत्या केल्या. पहिल्या विनंती अंतर्गत स्वच्छता राखण्याचे तसेच एकदाच वापर करून टाकाव्या लागणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केली.  दुसरी विनंती म्हणून त्यांनी पर्यटक आणि यात्रेकरूंना व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवावा आणि एकूण खर्चाच्या किमान पाच टक्के रक्कम स्थानिक पातळीवर उत्पादित झालेल्या वस्तूंच्या खरेदीपोटी खर्च करावी असे आवाहन केला, वाहतुकीचे नियम पाळावेत अशी तिसरी विनंतीही त्यांनी पर्यटक आणि यात्रेकरूंना केली आणि चौथ्या विनंतीपोटी देवस्थाने तसेच धार्मिक स्थळांचे नियम पाळत शिस्त राखण्याचे आवाहन त्यांनी पर्यटक आणि यात्रेकरूंना केले. देवभूमी, उत्तराखंडची ओळख अधिक ठाशीव करण्यासाठी आपण केलेल्या ९ विनंत्यांचे पालन  मोठी भूमिका बजावतील असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. देशाने समोर ठेवलेले संकल्प पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत उत्तराखंड राज्य महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाच्या समारोपावेळी व्यक्त केला.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …