निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या (DoPPW) वतीने 11 नोव्हेंबर 2024 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोंडा आणि मडगाव येथील मुख्य शाखांमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी)शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पेन्शनधारकांना त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विविध डिजिटल पद्धती वापरण्यास मदत करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी या शिबिरांना भेट दिली.
या विभागाच्या वतीने सोमवारी पणजी येथील सचिवालयात आणि म्हापसा येथील स्टेट बँकेच्या शाखांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली. DoPPW ने पेन्शनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी देशभर डीएलसी 3.0 मोहीम सुरू केली आहे. भारतातील 800 शहरांमध्ये एक ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत डीएलसी 3.0 मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेच्या प्रमुख भागीदारांमध्ये बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, पेन्शनधारकांच्या संघटना, UIDAI, MeitY, संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि दूरसंचार विभाग यांचा समावेश आहे. पेन्शनधारकांना डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्रे सादर करण्यास सहाय्य करण्यासाठी सर्व शहरांमध्ये शिबिरे घेतली जात आहेत तसेच अतिशय वयोवृद्ध किंवा विकलांग पेन्शनधारकांसाठी गृहभेटीसह विशेष व्यवस्था केली जात आहे.
दुर्गम भागातील किंवा मर्यादित हालचाल करू शकणाऱ्या पेन्शनधारकांनाही या सुविहित आणि सुलभ प्रणालीचा लाभ मिळेल याची खबरदारी घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.