आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघ (ITU) – जागतिक दूरसंवाद मानकीकरण परिषद (ITU-WTSA-2024) नवी दिल्ली येथे आयोजित केली जात असून, या कार्यक्रमाला समांतर उपक्रम म्हणून रोबोटिक्स फॉर गुड यूथ चॅलेंज या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा एक प्रतिष्ठेचा राष्ट्रीय कार्यक्रम असून एआय फॉर गुड इम्पॅक्ट इंडियाचा एक भाग म्हणून आयोजित केला जात आहे. जिनिव्हा येथे एआय फॉर गुड ग्लोबल समिट 2025 दरम्यान महाअंतिम फेरीतील प्रवेशाची पात्रता स्पर्धा आहे. युवा नवोन्मेषकांनी या कार्यक्रमात रोबोटिक्स आणि कोडिंगमधील त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले.
रोबोटिक्स फॉर गुड युथ चॅलेंज या स्पर्धेसाठी एकूण 120 संघांनी अर्ज केले होते, त्यापैकी 51 संघांची त्यांची रोबोटिक्स सोल्यूशन्स( यंत्रमानवाद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजना) सादर करण्यासाठी निवड करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन ही या स्पर्धेची संकल्पना होती आणि यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ श्रेणीतील विजेते जुलै 2025 मध्ये जिनिव्हा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेतः
- सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स आणि कोडिंग शिकण्यात सर्वसमावेशकता वाढवणे.
- शाश्वत उद्दिष्टांशी सुसंगत अभियाने पूर्ण करण्यासाठी यंत्रमानवांची(रोबो) रचना, बांधणी आणि प्रोग्राम करणे.
- संघभावनेने काम करण्याला, समस्यांचे निराकरण करण्याला आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याला प्रोत्साहन देणे.
या स्पर्धेतील सहभागींसाठी सर्वात पहिले आव्हान होते ते भूकंपपीडितांचे जीव वाचवणारी प्रणाली विकसित करण्याचे. वास्तविक भूकंपासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी एक सिम्युलेशन प्रणाली चालवण्यात आली ज्यामध्ये भूकंपपीडितांचे जीव वाचवण्यासाठी आणि पीडितांना सुरक्षित आश्रय आणि रुग्णालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रमानवांना प्रोग्राम(आज्ञाप्रणालीने सज्ज) करण्यात आले.
या कार्यक्रमात टॉमस लमानौस्कस- उपसरचिटणीस आयटीयू, डॉ. नीरज मित्तल, दूरसंचार विभागाचे सचिव, आयटीयूच्या दूरसंवाद मानकीकरण ब्युरोचे(TSB) संचालक सिझो ओनो, दूरसंवाद विभागाच्या डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशनचे(फायनान्स) सदस्य मनिष सिन्हा यांची बीजभाषणे झाली. त्याशिवाय आयटीयूच्या सरचिटणीस डोरीन बोगदान-मार्टिन, आय-हब फाऊंडेशन फॉर कोबोटिक्स(IHFC)चे प्रकल्प संचालक प्रा. एस. के. सहा यांचा विशेष अतिथींमध्ये समावेश होता.
पुरस्कार वितरण सोहळ्याने या स्पर्धेचा समारोप झाला. यामध्ये वरिष्ठ श्रेणीत दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोड, दिल्लीचा एआय पायोनियर्स हा संघ विजेता ठरला तर कनिष्ठ श्रेणीत संत अतुलानंद कॉन्व्हेन्ट स्कूल, कोराजपूर, वाराणसी, उत्तर प्रदेशच्या रेस्क्यू रेंजर्सचा संघ विजेता ठरला.
आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024: शेपिंग द फ्युचर ऑफ ग्लोबल टेलिकम्युनिकेशन्स
सामाजिक कल्याण आणि सार्वजनिक आरोग्याला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जागतिक दूरसंवाद मानकीकरण परिषदेची वचनबद्धता या कार्यक्रमांनी अधोरेखित केली. विविध हितधारकांना एकत्र आणून डब्ल्यूटीएसए 2024 संवेदनशील जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवोन्मेषाचा मार्ग प्रशस्त करत आहे.