43व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातल्या दालनात (हॉल क्रमांक 4, स्टॉल क्रमांक 4F-6A, 1 ला मजला) एक व्यापक नोंदणी मोहीम आयोजित करून जीईएम या वर्षीची संकल्पना “विकसित भारत@2047” ला अनुरूप देशभरातील सहभागी विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना सामावून घेण्यासाठी सज्ज झाले आहे. 14 ते 27 नोव्हेंबर 2024 दरम्यान भारत मंडपम संकुल, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सरकारी ई-बाजारपेठ (जीईएम) सहभागी होत आहे.
सर्वसमावेशक आर्थिक विकासाला गती देण्यात पोर्टलच्या भूमिकेवर भर देत, जीईएम सरकारच्या “एक जिल्हा, एक उत्पादन” योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना, विशेषत: कारागीर, विणकर, शिल्पकार यांना सार्वजनिक खरेदी व्यवस्थेत त्यांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी, जीईएम दालन, पूर्णपणे विनामूल्य त्वरित कॅटलॉग अपलोडिंग मदतीसाठी व्यावसायिक फोटो शूटसह सुसज्ज आहे.
4 लाख कोटींहून अधिक वार्षिक सार्वजनिक खरेदीशी संलग्न थेट बाजारपेठ त्याचे विविध फायदे अधोरेखित करून पोर्टलचा व्यापक प्रसार वाढवण्यासाठी आणि त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जीईएम चे प्रतिनिधी प्रत्येक स्टॉलला भेट देखील देतील.
भारताची संस्कृती, व्यापार आणि नवोन्मेष यांचे दर्शन घडवणारा 43 वा आयआयटीएफ हा भरभराट होत असलेल्या जीईएम या सरकारी खरेदी बाजारपेठेत देशांतर्गत विक्रेत्यांसाठी सहकार्याला चालना देण्यासाठी आणि व्यावसायिक संधी वाढवण्यासाठी एक उल्लेखनीय मंच आहे.
जीईएम बद्दल:
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जो विविध केंद्रीय / राज्य मंत्रालये, विभाग, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पंचायती आणि सहकारी संस्थांद्वारे वस्तू आणि सेवांची खरेदी सुलभ करते. ‘किमान सरकार, कमाल शासन’ साध्य करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमधून 2016 मध्ये जीईएम ची स्थापना झाली. अकार्यक्षमता आणि पारदर्शकतेशी संबंधित समस्या असलेली गुंतागुंतीची आणि जुन्या स्वरूपाची सार्वजनिक खरेदी प्रक्रिया रद्द करण्याच्या स्पष्ट उद्देशाने ऑनलाइन पोर्टलची स्थापना करण्यात आली.
सरकारी खरेदीदारांच्या तिन्ही स्तरांसाठी (केंद्र, राज्य आणि पंचायती राज संस्था) जीईएम एक कागदरहित, रोकडरहित आणि थेट संबंध नसलेली व्यवस्था आहे ज्याद्वारे देशभरातील विक्रेते आणि सेवा प्रदात्यांच्या विस्तृत श्रेणीतील उत्पादने आणि सेवांची पूर्णपणे डिजीटल ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी करता येईल. सरकारी खरेदी प्रणालीला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि सर्व हितधारकांसाठी शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची क्षमता आणि गती वापरण्याच्या उद्देशाने जीईएमची कल्पना करण्यात आली होती.