केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी भारत जल सप्ताह 2024 च्या समारोप सोहळ्यात “भू-नीर” या नवीन पोर्टलचे डिजिटल स्वरूपात उद्घाटन केले. हे अत्याधुनिक पोर्टल केंद्रीय भूजल प्राधिकरणाने (सीजीडब्ल्यूए), जलशक्ती मंत्रालयांतर्गत, राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या सहकार्याने विकसित केले आहे. देशभरातील भूगर्भजलाच्या प्रभावी नियमनासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. भूजलाच्या शाश्वत वापरासाठी पारदर्शकता, कार्यक्षमता, आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे हा भू-नीर पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.
“भू-नीर” पोर्टलवर भूगर्भजलाच्या उपशासित वापराबाबत असलेल्या कायदेशीर चौकटीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तसेच, भूगर्भजल उपसा आणि संबंधित नियमांबाबत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील धोरणांची माहिती देखील येथे उपलब्ध आहे. या पोर्टलद्वारे केंद्रीय डेटाबेसचा वापर करून भूजलासंबंधित अनुपालन, धोरणे आणि शाश्वत पद्धतींची माहिती मिळवता येईल.
पॅन-आधारित सिंगल आयडी प्रणाली, क्यूआर कोडसह एनओसी, वापरण्यास सोपी माहितीपूर्ण यंत्रणा ही या पोर्टलची वापरकर्त्यांसाठी अनुकूल ठरतील अशी वैशिष्ठ्ये आहेत. “भू-नीर” पोर्टल पूर्वीच्या “एनओसीएपी” पोर्टलच्या तुलनेत अधिक प्रगत आहे.
“भू-नीर” पोर्टल, पंतप्रधानांच्या “इज ऑफ डूइंग बिजनेस” या संकल्पनेला पुढे नेणाऱ्या उपक्रमांपैकी एक असून, भूगर्भजल नियमन प्रक्रिया अधिक सोपी व डिजिटल स्वरूपात करण्याचा प्रयत्न आहे.
हे पोर्टल आता सर्वसामान्यांसाठी खुले आहे. सर्व प्रकल्प प्रस्तावक भूगर्भजल वापराशी संबंधित शंका,अर्जाचा तपशील जाणून घेणे, शुल्क भरणे यासाठी वापरकर्ते या पोर्टलला भेट देऊ शकतात.