पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद बिहारकडे असेल. युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या पथदर्शी उपक्रमाअंतर्गत खेलो इंडिया स्पर्धांच्या यजमानांच्या नकाशात आता बिहारचे नांव जोडले जाईल.
समर ऑलिम्पिक्सच्या धर्तीवर आयोजित खेलो इंडिया दिव्यांग क्रीडा स्पर्धाही पहिल्यांदाच बिहारमध्ये होणार आहेत. युवा क्रीडा स्पर्धेनंतर लगेचच 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दिव्यांग क्रीडा स्पर्धा होतील. दिव्यांगांसाठीची पहिली क्रीडा स्पर्धा गेल्या वर्षी दिल्लीत झाली होती.
“खेलो इंडिया स्पर्धा देशाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनानुसार बिहारमध्ये एक नव्हे तर दोन क्रीडा स्पर्धा होत आहेत. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात क्रीडा क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असेल. महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी समर्थ असल्याचे नुकतेच बिहारने दाखवून दिले आहे,” केंद्रिय युवा कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले.
पायाभूत सुविधांचा विकास व ग्रामीण पातळीवरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या मंत्रालयाच्या योजनेचा बिहार राज्य एक अविभाज्य भाग आहे.
नैपुण्यविकास हा खेलो इंडिया उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि क्रीडा विभागाच्या विकास प्रकल्पांच्या महत्त्वाच्या लाभार्थ्यांमध्ये बिहारचाही समावेश होतो. बिहारमध्ये 38 खेलो इंडिया केंद्र आणि सर्व स्तरांवरील खेळाडूंना सोईसुविधा पुरविणारे खेलो इंडिया राज्यस्तरीय सर्वोत्कृष्टता केंद्रही आहे. याशिवाय तीन SAI (भारतीय क्रीडा प्राधिकरण) प्रशिक्षण केंद्रदेखील आहेत.