रियल इस्टेट क्षेत्राने या उद्योगाची मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी अधिक मोठ्या औपचारिकीकरणाचा विचार करायला हवा असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. क्रेडाई (भारतीय स्थावर मालमत्ता विकासकांच्या संघटनांचा महासंघ)च्या 25 व्या स्थापनादिनानिमित्त नवी दिल्ली येथे आज आयोजित कार्यक्रमात बीजभाषण करताना ते बोलत होते. त्यांनी कामगारांना औपचारिक रोजगारात सहभागी करून घेऊन त्यांना विमा (ईएसआयसी) तसेच भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) यांसारखे सामाजिक संरक्षणाचे लाभ दिले पाहिजेत असे ते म्हणाले.यामुळे वार्षिक अहवाल तसेच राष्ट्रीय आकडेवारीमध्ये दिसून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येसाठी मदत होईल. जर कामगारांना सामाजिक सुरक्षितता,आरोग्य आणि निवृत्तीपश्चात लाभ दिले गेले तर ते कामगार त्यांच्या कामाची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्योगाच्या उद्दिष्टांशी जुळवून घेऊ शकतील आणि त्यायोगे या क्षेत्राला अधिक उत्पादकता आणि जास्त नफा मिळेल असे ते म्हणाले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी क्रेडाई ला त्यांचे 14,000 सदस्य औपचारिक करण्याची देखील विनंती केली.जर क्रेडाईसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला डिजिटल पेमेंटद्वारे वेतन मिळेल आणि जर या परिसंस्थेत काम करणारे कामगार लोकांच्या गरजा भागवण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रयत्नांचा भाग असतील तर रोजगाराप्रती क्रेडाईच्या योगदानाला ओळख मिळेल आणि त्यांचा गौरव होईल असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात गोयल यांनी पर्यावरणातील प्रदूषणाचा मुद्दा मांडला आणि भारतातील महानगरांमध्ये अधिक चांगली बांधकाम तंत्रे स्वीकारण्याच्या मार्गांचा अभ्यास करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्याची सूचना क्रेडाईला केली. क्रेडाईने काम मोहीम स्वरुपात हाती घ्यावे आणि या दिशेने उचललेल्या पावलांचा अहवाल सरकारला द्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
भारताला शक्तीकेंद्र बनवण्यात तसेच विकसित भारताच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासात देखील क्रेडाईने दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि ते पुढे म्हणाले की या उद्योगाने केवळ विटा आणि सिमेंटसह देशाला सामुहिकपणे भविष्यासाठी सज्ज केले नाही तर देशाला संधी आणि आकांक्षा पुरवण्यासाठी देखील काम केले आहे.रियल इस्टेट क्षेत्राने अर्थव्यवस्थेत आणि नोकऱ्यांमध्ये योगदान दिले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पूर्वीच्या काळात मालकीची घरे घेण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणींवर अधिक भर देत, गेल्या दहा वर्षांत प्रक्रियांच्या स्वच्छतेसाठी, उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवसायांना विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एकत्रितपणे करण्यात आलेल्या प्रयत्नांकडे केंद्रीय मंत्री गोयल यांनी निर्देश केला.
बँकिंग प्रणाली स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून गोयल म्हणाले की बँकांच्या अनुत्पादक मालमत्ता (एनपीएज) लक्षणीयरित्या कमी झाल्या असून बँकांचा कर्जविषयक पोर्टफोलिओ मजबूत ताळेबंदासह सशक्त झाला आहे आणि बँका दर वर्षी निकोप लाभ मिळवत आहेत.
किफायतशीर भाडेतत्वावरील घरांबाबत देखील केंद्रीय मंत्री गोयल यांनी चर्चा केली. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी पुनर्वसन कार्यक्रम सुरु करण्यासोबतच नागरिकांना परवडणारी भाडेकरारावरील घरे उपलब्ध करून देण्याचे मार्ग शोधण्यासाठी सरकार क्रेडाईशी चर्चा करणार आहे अशी घोषणा देखील त्यांनी केली.