भारता आणि टांझानिया यांच्यातील संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची (जेडीसीसी) तिसरी बैठक आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी गोवा येथे पार पडली. या बैठकीदरम्यान, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी प्रशिक्षण क्षेत्रातील वाढती भागीदारी तसेच दोन्ही देशांच्या सेवा क्षेत्रांतील, सागरी आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांतील सहयोगासह सहकार्याच्या इतर अनेक क्षेत्रांबाबत चर्चा केली.तसेच, यापूर्वीच्या जेडीसीसीच्या बैठकींमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीतील प्रगतीचा देखील त्यांनी आढावा घेतला आणि संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यात आणखी वाढ करता येण्याजोग्या नव्या क्षेत्रांचा अंदाज घेतला.
भारताचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळात केंद्रीय संरक्षण मंत्रालय तसेच सशत्र दलांतील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.भारताचे टांझानियामधील उच्चायुक्त विश्वदीप डे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. लँड फोर्सेस कमांडर मेजर जनरल फाधील ओमारी नोंदो यांनी टांझानियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
या भारत दौऱ्याचा भाग म्हणून टांझानियाच्या शिष्टमंडळ गोवा शिपयार्डला भेट देऊन बंदर विकास आणि जहाज बांधणी क्षेत्रातील भारताच्या क्षमतांचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहे.हे शिष्टमंडळ गोव्यात आयएनएस हंसा तसेच नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायड्रोग्राफीला देखील भेट देणार आहे.
भारताचे टांझानियाशी दृढ, स्न्हेह्पूर्ण आणि मैत्रीचे संबंध आहेत आणि सशक्त क्षमता निर्मिती आणि भागीदारी विकसित करण्यासाठीच्या अनेक मार्गांद्वारे त्यांना अधिक चालना मिळत आहे.संरक्षणविषयक सहकार्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दोन्ही देशांनी पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे.