भीष्म (335 यार्ड) आणि बाहुबली(336 यार्ड) या 25 टी बोलार्ड पुल टग्जचा 28 नोव्हेंबर 2024 रोजी नौदलाच्या जहाज दुरुस्ती यार्डात झालेल्या कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत समावेश करण्यात आला. अंदमान निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ एयर मार्शल साजू बालकृष्णन या कार्य्रक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
25 टी बीपी प्रकारातल्या सहा टग्जची बांधणी आणि पुरवठा यासाठी कोलकात्याच्या मेसर्स टिटागड रेल सिस्टिम्स लि. सोबत 12 नोव्हेंबर 21 रोजी करार करण्यात आला होता. एका भारतीय जहाज रचना कंपनीसोबतच्या सहकार्याने शिपयार्डने या टग्जची संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीने रचना केली आहे. नौदलाचे नियम आणि भारतीय जहाज नोंदणीपुस्तिका नियमनानुसार हे टग्ज तयार करण्यात आले असून भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांचे ते अभिमानाने प्रतिनिधित्व करत आहेत.
हे टग्ज भारतीय नौदलाची जहाजे आणि पाणबुड्यांना बंदिस्त जलामध्ये बर्थिंग, अन-बर्थिंग, वळण्याची क्रिया आणि पाण्यातील परिचालन यामध्ये मदत करतील आणि त्यायोगे जहाजांच्या परिचालनात प्रत्यक्ष सहाय्यकारक ठरतील. हे टग्ज पाण्यामधील तैनातीदरम्यान अग्निशमन कार्यासाठी जहाजांसोबत आणि नांगर प्रक्रियेदरम्यान मदत पुरवतील. त्याचप्रकारे मर्यादित प्रमाणात शोध आणि बचाव कार्य करण्याची देखील त्यांची क्षमता आहे.