केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री जितन राम मांझी यांनी आज नवी दिल्ली येथे 43 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (आयआयटीएफ) 2024 मधील दालन क्र. 6 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या “एमएसएमई पॅव्हिलियन” चे उद्घाटन केले. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त डॉ. रजनीश यांच्यासह मंत्रालयातील इतर ज्येष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एमएसएमई उद्योगांना त्यांच्या व्यावसयिक परिचालनामध्ये परिवर्तन घडवून अधिक स्वच्छ/हरित तंत्रज्ञानांच्या स्वीकारावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देणारी “हरित एमएसएमईज” ही या पॅव्हिलियनची मुख्य संकल्पना आहे. त्याशिवाय सुमारे 18 प्रकारच्या विविध उद्योगांमध्ये गुंतलेल्या हस्तकलाकारांना तसेच कारागिरांना संपूर्ण पाठबळ पुरवणाऱ्या एमएसएमई मंत्रालयाच्या “पंतप्रधान विश्वकर्मा योजना” या महत्त्वाच्या योजनेच्या माहितीवर देखील या पॅव्हिलियनमध्ये अधिक भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी या योजनेची सुरुवात केली होती.
43 व्या आयआयएफटी -2024 मधील एमएसएमई पॅव्हिलियन मध्ये देशातील 29 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 200 उद्योजकांनी भाग घेतला आहे. या दालनात वस्त्रे, हातमागावरील उत्पादने, हस्तकला, भरतकाम, चामड्याची पादत्राणे, खेळ आणि खेळणी, बांबूच्या कलाकुसरीच्या वस्तू, वेताच्या वस्तू, मौल्यवान रत्ने आणि दागिने, चिनीमातीच्या वस्तू आणि मातीची भांडी, यांत्रिक वस्तू अशी विविध प्रकारची उत्पादने मांडण्यात आली आहेत. या मेळाव्यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना, विशेषतः महिला तसेच अनुसूचित जाती आणि जमातींमधील उद्योजकांच्या मालकीच्या उद्योगांना, आणि आकांक्षित जिल्ह्यांमधील उद्योजकांना त्यांची उत्पादने तसेच सेवा यांची जाहिरात खूप मोठ्या प्रमाणातील संभाव्य ग्राहकांसमोर करण्याची संधी मिळाली आहे.
समावेशक विकासाप्रती मंत्रालयाच्या वचनबद्धतेला अनुसरत, या पॅव्हिलियन मधील 200 स्टॉल्सपैकी 71% स्टॉल्स महिला उद्योजकांना आणि 45% स्टॉल्स अनुसूचित जाती आणि जमातींमधील उद्योजकांना मोफत देण्यात आले आहेत. त्याशिवाय 35% स्टॉल्स आकांक्षित जिल्ह्यांमधील उद्योजकांना देण्यात आले असून यावर्षीच्या एकूण सहभागी उद्योजकांपैकी 85% उद्योजक पहिल्यांदाच या मेळाव्यात सहभागी झाले आहेत.
केंद्रीय मंत्री जितेन राम मांझी यांनी यावेळी पॅव्हिलियन मधील प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध उद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांना या मेळाव्यातील सहभागासाठी प्रोत्साहित केले. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी यावेळी एक ‘पथनाट्य’ देखील सादर करण्यात आले.