केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज अमेरिकेतील बाल्टिमोर, मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (जेएचयु) चे अध्यक्ष रोनाल्ड जे. डॅनियल्स यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळात गुप्ता-क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूट (जीकेआयआय) चे अधिकारी देखील सहभागी झाले होते. जीकेआयआय हा जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचा एक अंतर्गत विभाग आहे, जो संशोधन, शिक्षण, धोरण आणि परिचालन याद्वारे भारतीय भागीदारांसोबत जेएचयु मधील संशोधकांना एकत्र आणण्याचे कार्य करतो.
धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय उच्च शिक्षण संस्थांसोबत मजबूत भागीदारी निर्माण करण्याप्रति विद्यापीठाच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. विशेषतः दुहेरी पदवी अभ्यासक्रम, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची गतिशीलता, तसेच डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान यांसारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमधील संशोधन यामधील योगदानाची प्रशंसा केली. या सहयोगांद्वारे दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आणि उद्योजकता वाढविण्याच्या क्षमतेवर त्यांनी भर दिला.
या चर्चेत जेएचयु आणि भारतातील प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक आणि संशोधन सहयोग मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसेच भारतात जेएचयु चे एक केंद्र स्थापन करण्यावरही चर्चा करण्यात आली.
भारताच्या विविध शहरांच्या दौऱ्याचा भाग म्हणून, हे शिष्टमंडळ भारतातील विविध विद्यापीठांना भेट देईल आणि प्रमुख सरकारी अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी तसेच भारतीय वकिलातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधून जेएचयु च्या भारतातील कार्यांना आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना चालना देईल.