बहुप्रतीक्षित गाला प्रीमिअर्स तसेच रेड कार्पेट इव्हेंट्ससह, सिनेमॅटिक कलात्मकता, जागतिक प्रतिभा आणि अद्वितीय कथात्मक मांडणीच्या सोहळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी ) 55 वे पर्व सज्ज झाले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सोहळ्याची ही तिसरी आवृत्ती असेल, यासोबतच यंदाचा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2024 म्हणजे प्रक्षेकांना एक अविस्मरणीय अनुभव देणारा आणि सिनेमावर प्रचंड प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष सिने जगताशी जोडणारा मंच म्हणून पुढे आला आहे.
जागतिक आणि प्रादेशिक चित्रपटांचे भव्य प्रदर्शन
या वर्षीचा गाला प्रीमिअर प्रेक्षकांना सिनेमॅटिक मेजवानीचा अनुभव देणारा असणार आहे. यात सकस मनोरंजन करणाऱ्या चित्रपट, वेब सीरिज आणि माहितीपटांचा समावेश असणार आहे.
2024 च्या गाला प्रीमिअर्समध्ये विविध शैली, भाषा आणि संस्कृतींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कलाकृतींचा समावेश आहे. यात नऊ जागतिक प्रीमिअर, 4 आशिया प्रीमिअर, 1 भारतीय प्रीमियर आणि एका खास प्रदर्शनीय खेळाचा समावेश असणार आहे.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या गुन्हेगारीविषयक थरारक चित्रपटांपासून ते हृदयस्पर्शी कौटुंबिक कथानके आणि विचार करायला लावणाऱ्या सामाजिक कथांसारख्या प्रत्येक सिने रसिकांना भुरळ पाडतील अशा कलाकृतींचा समावेश यंदा केला गेला आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी, मल्याळम आणि तेलुगू सह विविध भाषांमधील वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती यंदा प्रदर्शित केल्या जाणार आहेत. एका अर्थाने अशाप्रकारच्या कलाकृतींच्या समावेशामुळे यंदाचा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2024 खऱ्या अर्थाने जागतिक तसेच प्रादेशिक चित्रपटांचा समावेश असलेला सर्वसमावेशक उत्सव म्हणून आपली ओळख अधिक ठाशीव करणारा ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवात ‘द पियानो लेसन’, ‘झिरो से रिस्टार्ट’, ‘साली मोहब्बत’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘पुणे हायवे’, ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’, ‘मेहता बॉईज’, ‘जब खुली किताब’, ‘हिसाब बराबर’, ‘मिसेस’, ‘फार्मा’, ‘विक्कटाकवी’, ‘हेडहंटिंग टू बीटबॉक्सिंग’, ‘मोआना 2’ आणि ‘राणा दग्गुबती शो’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट सीमा ओलांडून कथात्मक मांडणीच्या नव्या पद्धतींचे प्रयोग करू पाहणारे चित्रपट आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना चित्रपटांची एकता आणि प्रेरणादायी क्षमतेचा अनुभव घेता येणार आहे.
लखलखणारे तारे- तारका आणि त्यांचे वलय यांनी शोभायमान होणार रेड कार्पेट
दिग्गज तारे-तारकांच्या उपस्थितीत रेड कार्पेटवरील चमकदार कार्यक्रमांनी इफ्फी 2024 गाजणार आहे. यामध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते, अभिनेते आणि सिनेसष्टीतील इतर ख्यातनाम कलावंत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
सिनेजगतातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे आणि प्रसिद्धीच्या क्षितिजावरील उदयोन्मुख कलाकार यांची मांदियाळी या महोत्सवात अपेक्षित असल्याने, झगमगत्या, वलयांकित आणि अविस्मरणीय क्षणांच्या अनेक रजनी यानिमित्ताने अनुभवाला येतील. राणा दग्गुबाती, विधू विनोद चोप्रा, संध्या मल्होत्रा, विक्रांत मासी, आर.माधवन, ए.आर.रहमान आणि सौरभ शुक्ला यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे रेड कार्पेटवरील कार्यक्रमांना उपस्थित राहून सिनेसृष्टीतील कलावंतांबरोबर तसेच प्रसिद्धीमाध्यमांबरोबर चित्रपटांच्या जादुई क्षणांचा आनंद घेतील.
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकार आणि चित्रनिर्मात्यांच्या सान्निध्याची संधी रेड कार्पेट विभागाद्वारे मिळते. त्यामुळे इफ्फीमधील कार्यक्रमांपैकी रेड कार्पेट विभागाच्या कार्यक्रमांतून सर्वाधिक अपेक्षापूर्ती होण्याची चाहत्यांना खात्री असते. हे केवळ अद्ययावत फॅशनची चमक-दमक दाखवणारे ठिकाण नसून, तो प्रतिभा; सर्जकता आणि सिनेमाच्या सांस्कृतिक औचित्यपूर्णतेचा सोहळा असतो.
उत्कृष्टता आणि वलयाचा वारसा –
सर्वोत्कृष्ट चित्रपट कलाकृती प्रदर्शित करून, चित्रजगताची महती स्पष्ट करणारे, कलाकारी आणि प्रतिभा साजरी करणारे ‘गाला प्रीमियर्स’ हे गेल्या काही वर्षांपासून, इफ्फीच्या वारशाचे मानदंड बनले आहेत. जागतिक स्तरावरील एक उत्तम चित्रपट महोत्सव म्हणून इफ्फीला नावारूपाला आणण्यासाठी यापूर्वीच्या महोत्सवांतील गाला प्रीमियर्स विभागाने, मोलाची कामगिरी बजावली आहे. समीक्षकांनी प्रशंसा केलेले अनेक चित्रपट जसे की – दृश्यम -2, भेडिया, कडक सिंग, गांधी टॉक्स, आणि फौदा (चौथा सीझन) सारखी आंतरराष्ट्रीय मालिका – यापूर्वीच्या गाला प्रीमियर्समध्ये प्रदर्शित झाले आहेत. सलमान खान, अजय देवगण, नवाजुद्दीन सिद्दिकी, वरूण धवन, विजय सेतुपती, अदिती राव हैदरी अशा कित्येक सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे रेड कार्पेटवरचे चमकते क्षण शोभायमान झाले आहेत.
महोत्सवाची एक अविस्मरणीय अनुभूती-
55 वा इफ्फी महोत्सव म्हणजे – उच्च जागतिक दर्जाचे चित्रपट, रेड कार्पेटवरील प्रसिद्ध तारकांची मांदियाळी, आणि चित्रपटांच्या जादूई जगताशी जोडून घेण्याची प्रेक्षकांना मिळणारी अद्वितीय संधी- यांचे अद्भुत मिश्रण ठरणार आहे. कथाकथन, वलय यांसोबतच एक संस्कृती साजरी करण्याच्या रोमहर्षक प्रवासासाठी हा अद्वितीय इफ्फी महोत्सव, चित्रपटरसिकांना निमंत्रण देत आहे. जागतिक आणि प्रादेशिक प्रतिभांना एकत्र आणणारा अतुलनीय अनुभव प्रदान करण्याचे इफ्फी 2024 चे उद्दिष्ट आहे.
गाला प्रीमियरचे वेळापत्रक आणि रेड-कार्पेटवरील पाहुणे
तारीख |
वेळ |
चित्रपट/प्रकल्प |
रेड कार्पेटवरील पाहुणे |
21 नोव्हेंबर 2024 |
दु. 12:30 वा |
द पियानो लेसन |
|
21 नोव्हेंबर 2024 |
दु. 4:30 वा |
द राणा डग्गुबती शो |
राणू डग्गुबती |
21 नोव्हेंबर 2024 |
दु. 5:45 वा. |
झिरो से रीस्टार्ट |
विधू विनोद चोप्रा, |
22 नोव्हेंबर 2024 |
दु. 12 वा. |
स्नो फ्लॉवर |
छाया कदम, वैभव मांगले, सरफराज आलम सफू, गजेंद्र विठ्ठल अहिरे, दीपक कुमार, रेखा भगत |
22 नोव्हेंबर 2024 |
सं 5.00 वा |
साली मोहब्बत |
दिव्येंदू शर्मा, टिस्का चोप्रा, मनीष मल्होत्रा, ज्योती देशपांडे, दिनेश मल्होत्रा |
22 नोव्हेंबर 2024 |
सं 5:45 वा |
मिसेस |
सान्या मल्होत्रा, आरती |
23 नोव्हेंबर 2024 |
दु. 4:30 वा |
विकटकवी |
नरेश अगस्त्य, मेघा |
23 नोव्हेंबर 2024 |
सं. 5:30 वा. |
पुणे हायवे |
अमित साध, मंजरी फडणीस, केतकी नारायण, अनुभव पाल, |
24 नोव्हेंबर 2024 |
दु. 12 वा |
शोले ट्रेलर + |
रमेश सिप्पी + |
25 नोव्हेंबर 2024 |
दु. 4:30 वा |
कन्नप्पा (शोकेस) |
विष्णू मंचू, |
25 नोव्हेंबर 2024 |
सं. 5:15 वा |
मेहता बॉईज |
बोमन इराणी, अविनाश तिवारी, श्रेया चौधरी, दानेश इराणी |
26 नोव्हेंबर 2024 |
सं. 5:00 वा |
जब खुली किताब |
डिंपल कपाडिया, पंकज |
26 नोव्हेंबर 2024 |
सं. 5:45 वा |
हिसाब बराबर |
आर माधवन, कीर्ती कुल्हारी, नील नितीन मुकेश, अश्वनी धीर |
27 नोव्हेंबर 2024 |
सं. 5:15 वा |
फार्मा (मालिका) |
निविन पॉली, रजित कपूर, आलेख कपूर, नरेन, श्रुती रामचंद्रन, वीणा नंदकुमार |
27 नोव्हेंबर 2024 |
सं. 5:45 वा |
हेडहंटिंग टू बीटबॉक्सिंग |
एआर रहमान, रोहित गुप्ता, अमित मलिक, मनील गुप्ता |