भारतीय लष्कर आणि कंबोडियाचे लष्कर यांच्यात सीनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला आज पुण्यात फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. . हा सराव 1 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान चालेल. कंबोडियन लष्कराच्या तुकडीमध्ये 20 जवान असतील आणि भारतीय लष्कराच्या तुकडीत इन्फंट्री ब्रिगेडच्या 20 जवानांचा समावेश असेल.
सीनबॅक्स सराव हा संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत दहशतवादविरोधी संयुक्त कारवाईच्या युद्धाभ्यासाच्या उद्देशाने आयोजित एक नियोजनात्मक सराव आहे. या सरावामध्ये दहशतवादविरोधी वातावरण निर्मितीसाठी कारवाईच्या नियोजनाबरोबरच गुप्तचर तत्परता, निगराणी आणि टेहळणीसाठी संयुक्त प्रशिक्षण कृतिदलाच्या स्थापनेशी संबंधित चर्चेवर भर दिला जाईल. याठिकाणी विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये युद्धविषयक सराव केला जाईल आणि पारंपरिक कारवायांच्या उपप्रकारांमध्ये बल गुणकांच्या (फोर्स मल्टीप्लायर)ची संख्या वाढवण्यावर देखील चर्चा केली जाईल. या सरावात माहिती संचालन , सायबर युद्ध, हायब्रीड युद्ध, लॉजिस्टिक्स आणि अपघात व्यवस्थापन, एचएडीआर मोहीम इत्यादींवर चर्चा केली जाईल.
हा सराव तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान दहशतवाद विरोधी कारवायांसाठी सहभागींची तयारी आणि अभिमुखता यावर लक्ष केंद्रित करेल. टप्पा-II मध्ये टेबल टॉप सराव आयोजित केला जाईल आणि टप्पा-III मध्ये योजनांना अंतिम रूप देणे आणि सारांश तयार करणे समाविष्ट असेल. यामुळे संकल्पना-आधारित प्रशिक्षणाच्या व्यावहारिक पैलूंबाबत माहिती मिळेल आणि सहभागींना परिस्थिती-आधारित चर्चा आणि रणनीतिक अभ्यासाद्वारे कार्यपद्धती समजून घेण्यास सक्षम करण्याचा या सरावाचा हेतू आहे.
या सरावात ‘आत्मनिर्भरता’ आणि संरक्षण उत्पादनातील स्वदेशी क्षमतांना प्रोत्साहन देणारी भारतीय बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे देखील प्रदर्शित केली जातील.
पहिल्या सिनबॅक्स सरावात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये विश्वास, सौहार्द वाढवणे आणि अपेक्षित स्तरावरील आंतरकार्यक्षमता साध्य करण्यावर भर दिला जाईल. शांतता राखण्याच्या मोहिमा हाती घेताना दोन्ही सैन्याच्या संयुक्त कार्यक्षमतेतही यामुळे वाढ होणार आहे.