संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 02 नोव्हेंबर 2024 रोजी, उत्तर प्रदेशातील ऍडव्हान्स वेपन्स ऍन्ड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWEIL) चे युनिट असलेल्या कानपूर येथील फील्ड गन कारखान्याला भेट दिली. हा कारखाना टी-90 आणि धनुष गनसह विविध तोफा आणि रणगाड्यांचे बॅरल आणि ब्रीच यांची जुळणी करण्यात प्रवीण आहे.
या भेटीदरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी हीट ट्रीटमेंट तसेच कारखान्याच्या नवीन असेंब्ली शॉपसह महत्त्वाच्या सुविधांची पाहणी केली आणि महत्त्वपूर्ण स्वदेशी संरक्षण क्षमतांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत हे देखील होते.
शॉप फ्लोअरला भेट दिल्यानंतर, राजनाथ सिंह यांना कानपूर येथील ऍडव्हान्स वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड, ट्रुप कम्फर्ट इंडिया लिमिटेड आणि ग्लायडर्स इंडिया लिमिटेड या तीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या (DPSUs) च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी तसेच कानपूर येथील डीआरडीओ ची प्रयोगशाळा ‘संरक्षण साहित्य तसेच स्टोअर्स संशोधन आणि विकास आस्थापनेचे’ संचालक यांनी अधिक माहिती दिली.
सादरीकरणादरम्यान, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या (DPSUs) च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी संरक्षण मंत्र्यांना उत्पादन प्रोफाईल, चालू असलेले मोठे प्रकल्प, संशोधन आणि विकास प्रयत्न तसेच सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी हाती घेतलेल्या आधुनिकीकरण उपक्रमांबद्दल माहिती दिली.
एडब्ल्युईआयएल ही संस्था लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर गन प्रणालीच्या निर्मितीमध्ये निष्णात आहे. टीसीएल ची मुख्य उत्पादने म्हणजे युद्ध गणवेश, बॅलिस्टिक प्रोटेक्टिव्ह गियर्स, अत्यंत थंडीत वापरण्याचे कपडे आणि अत्युच्च ठिकाणी राहण्यासाठी आवश्यक तंबूही आहेत. तर, जीआयएल हे भारतातील पॅराशूटचे सर्वात मोठे आणि जुने उत्पादन युनिट आहे.