भारतीय महसूल सेवा (IRS) (सीमाशुल्क व अप्रत्यक्ष कर) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (2 डिसेंबर 2024 रोजी) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी उद्देशून राष्ट्रपती म्हणाल्या, कि भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क व अप्रत्यक्ष कर) चा थेट संबंध आपल्या अर्थव्यवस्थेतील समान करप्रणाली व सामायिक प्रशासनिक मूल्यांच्या द्वारे जोडला गेला आहे. ही सेवा देशातील कर व्यवस्थापनातील समानतेचा पुरस्कार करते. भारतीय महसूल सेवा अर्थात IRS अधिकारी हे भारत सरकार व विविध राज्यांमधील कर व्यवस्थापनांमधील एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतात.
राष्ट्रपती म्हणाल्या , कि जगभरातल्या बदलत्या सामाजिक आर्थिक परिप्रेक्ष्यात आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याद्वारेच देशाचे हित राखणे शक्य होते. भारतीय महसूल सेवेचे अधिकारी देशाच्या आर्थिक सीमारेषांचे रक्षक आहेत. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि समर्पणभावनेने काम करावे असे त्या म्हणाल्या. इतर देशांशी होणाऱ्या व्यापारी करारांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची राहील असे त्यांनी सांगितले.
देशातील आर्थिक विकासाच्या व पायाभूत सुविधांच्या उभारणीत, सामाजिक आर्थिक योजना राबवण्यात, शिक्षण व आरोग्य सेवा, इत्यादी पुरवण्यात संसाधनांचा योग्य वापर होण्यासाठी भारतीय महसूल सेवा (IRS) (सीमाशुल्क व अप्रत्यक्ष कर) अधिकारी मोठी मदत करतात असे राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या उभारणीतील IRS अधिकाऱ्यांचा महत्वाचा सहभाग यामुळे अधोरेखित होतो. प्रशासक या नात्याने महत्वाची भूमिका बजावताना त्यांनी कामातील पारदर्शकता व उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी योग्य प्रणाली व प्रक्रिया विकसित कराव्यात असे त्या म्हणाल्या.
सध्याच्या नूतन व गतिशील युगात कर संकलन प्रक्रिया कमी क्लिष्ट व अधिक तंत्रज्ञानाभिमुख होण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. कर प्रशासनात नवीन कल्पना व उपाययोजना आणण्याची जबाबदारी तरुण अधिकाऱ्यांवर आहे असे त्या म्हणाल्या.
करसंकलन हे केवळ देशाचा महसूल वाढवण्याचे साधन नसून ते सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासासाठीही आवश्यक आहे हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. देशाच्या नागरिकांनी भरलेल्या कराचा विनियोग देश व नागरिकांच्या विकासासाठी होत असतो. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी त्यांचे काम समर्पणभावनेने केल्यास देशाच्या विकासाला ते मोठाच हातभार लावू शकतात असे त्या म्हणाल्या.