अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसएचडी (डी)] ने 3 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांग मुलांसाठी ‘क्रीडा मेळावा’ आयोजित केला आहे. या महत्त्वाच्या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग मुलांच्या क्रीडा प्रतिभेला वाव देणे आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाच्या निमित्ताने आयोजित केला असून “समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांगजनांच्या नेतृत्वाला चालना देणे” या जागतिक संकल्पनेला अनुरूप आहे.
‘क्रीडा मेळावा’ चे उद्घाटन जिया राय या स्वमग्नता (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) असलेल्या 16 वर्षांच्या मुलीच्या हस्ते होईल, जी इंग्लिश खाडी पार करणारी सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा-जलतरणपटू म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष कार्यक्रम उद्या म्हणजे 3 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. आमदार ॲड. आशिष शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर सोसायटी फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ द डेफ-ब्लाइंड (एसईडीबी) इंडियाचे संचालक झमीर ढाले हे याप्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये ‘समावेशक वॉकेथॉन’ चा समावेश असून यामध्ये दिव्यांग मुलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी , सुगम्यतेबाबत जागरुकता वाढवण्यासाठी आणि मनोरंजक आणि आकर्षक खेळांद्वारे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. भारतीय सांकेतिक भाषा (ISL) वर ‘नुक्कड नाटक’ आयोजित करण्यात आले आहे. हे पथनाट्य दिव्यांगजनांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय सांकेतिक भाषा शिकण्याच्या महत्त्वाशी संबंधित आहे.
या अनोख्या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग मुलांसाठी क्रीडा आणि नेतृत्व विकासामध्ये समावेशकतेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे हा आहे, त्याचबरोबर शाश्वत आणि न्याय्य भविष्य घडवण्यासाठी समुदायाच्या सहभागाच्या सामर्थ्यावर भर देणे आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनी समावेशकता आणि सुगम्यतेचा पुरस्कार करेल.
एवायजेएनआयएसएचडी (डी) ही केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत एक संस्था आहे.