सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मुंबईतील एका प्रकरणांबाबत विशेष न्यायालयाने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या तत्कालीन उप महाव्यवस्थापकांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.तसेच फसवणूकीच्या खोट्या दाव्यातील सहभागातून मिळालेले 1.3 कोटी रुपये जप्त केले.
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडचे (NIACL) तत्कालीन उप महाव्यवस्थापक (DGM) आनंद प्रकाश मित्तल यांना (कंपनीच्या नायजेरियन उपकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रति नियुक्तीवर असताना) सेवा लाभाच्या फसवणूकीच्या खोट्या दाव्यात सहभागी असल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आनंद प्रकाश मित्तल यांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच या गुन्ह्यातून मिळालेल्या एकूण 1,30,50,630/- रुपये (अंदाजे 1.3 कोटी रुपये) किमतीच्या सहा मुदत ठेवी जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या रकमेवरील आजवरच्या जमा व्याजासह जप्त केलेली संपूर्ण रक्कम राज्य कोषात जमा केली जाणार आहे.
या प्रकरणी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडने आरोपींविरोधात फसवणूक आणि पदाचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने 14 सप्टेंबर 2016 रोजी RC No.12/E/2016 या अनुक्रमांकाअंतर्गत अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.आनंद प्रकाश मित्तल हे या कंपनीच्या नायजेरियातील उपकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून प्रति नियुक्तीवर असताना, मित्तल यांनी निवृत्तीवेतन आणि पदमुक्त होण्याच्या वेळेच्या भेटवस्तूंसंबंधी केलेल्या फसवणूकीच्या खोट्या दाव्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यावेळी मित्तल यांनी संचालक मंडळ अथवा कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेतात, 18 टक्के दराने निवृत्ती वेतनाच्या लाभाचा दावा केला. त्या अंतर्गतच मित्तल यांनी पैशांचे आपल्या नातेवाइकांच्या नावे मुदत ठेवींमधील गुंतवणूकीत परावर्तीत केल्याचा आरोप कंपनीने त्यांच्याविरोधात केला होता.
या प्रकरणाबाबत केंद्रीय अण्वेषण विभागाने सखोल चौकशी केल्यानंतर 27 डिसेंबर 2017 रोजी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण सुनावणीसाठी आलेल्या विशेष न्यायाधीशांनी सुनावणी पूर्ण झाल्यावर मित्तल यांना दोषी ठरवत, त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.