संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज, 12 नोव्हेंबर 2024 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथे ‘मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचर’ च्या सहाय्याने जहाजावरून जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एलआरएलएसीएम) पहिली उड्डाण चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान सर्व सहाय्यक प्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली आणि प्राथमिक मोहीम उद्दिष्टांची पूर्तता केली.
डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय कारखान्यांच्या योगदानासह बेंगळूरू येथील हवाई विकास आस्थापनेने एलआरएलएसीएम हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
V8H0.jpg)
हैदराबाद येथील भारत डायनॅमिक्स आणि बेंगळूरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांनी या प्रकल्पासाठी विकास आणि उत्पादन विषयक भागीदारांची भूमिका निभावली असून सदर क्षेपणास्त्राचे विकसन तसेच एकीकरण यामध्ये त्या सहभागी झाल्या. डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांमध्ये कार्यरत ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच या क्षेपणास्त्राचे अपेक्षित वापरकर्ते असलेल्या तिन्ही सेनादलांचे प्रतिनिधी उपरोल्लेखित चाचणीच्या वेळी उपस्थित होते.
या पहिल्याच उड्डाण चाचणीला मिळालेल्या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ,सशस्त्र दले आणि उद्योगांचे कौतुक केले आहे.एलआरएलएसीएमच्या पहिल्या चाचणीला मिळालेल्या यशाबद्दल केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे प्रमुख डॉ.समीर व्ही.कामात यांनी डीआरडीओच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.
Matribhumisamachar


