गुरुवार, दिसंबर 26 2024 | 11:48:37 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / इटली-भारत संयुक्त सामरिक कृती योजना 2025-2029

इटली-भारत संयुक्त सामरिक कृती योजना 2025-2029

Follow us on:

भारत-इटली सामरिक भागीदारीचे अतुलनीय महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्राझीलमध्ये रिओ-दि-जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेतील 18 नोव्हेंबर 2024 च्या बैठकीदरम्यान, तिला अधिक गती देण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुढीलप्रमाणे लक्ष्यकेंद्री आणि कालबद्ध उपक्रम आणि सामरिक कृतीची संयुक्त योजना आखण्यात आली आहे. या दिशेने, इटली आणि भारत या देशांनी पुढील गोष्टींना मान्यता दिली आहे:

I. राजकीय सुसंवाद

  1. दोन्ही देशांचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, वाणिज्यमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यादरम्यान नियमितपणे बैठका आणि दुतर्फा भेटीगाठी, तसेच बहुपक्षीय परिषदांच्या वेळीही अशा भेटी आणि संवाद कायम राखणे.
  2. दोन परराष्ट्र मंत्रालयांदरम्यान दरवर्षी वरिष्ठ अधिकारी स्तरावरील द्विपक्षीय सल्लामसलत करण्याची पद्धत तसेच परराष्ट्र व्यवहार कार्यालयाची सल्लामसलत सुरु ठेवणे.
  3. सामायिक स्वारस्याच्या सर्व क्षेत्रांतील सहकार्य दृढ करण्यासाठी अन्य मंत्रालयांच्या प्रमुखांच्या बैठका आणि संवादसत्रे अधिक परिणामकारक करणे.

II. आर्थिक सहकार्य आणि गुंतवणुका

  1. आर्थिक सह्कार्यावरील संयुक्त आयोग आणि अन्नप्रक्रियेवरील इटली-भारत संयुक्त कृती गट यांच्या समन्वयाने कामाचे बळ वाढवणे. यामध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवणे, बाजारपेठांमध्ये शिरण्याच्या संधी वाढवणे, गुंतवणूक- विशेषतः वाहतूक, शेतकी उत्पादने, यंत्रणा, रसायन-औषधे, लाकूड आणि लाकूडकाम, महत्त्वपूर्ण आणि उगवती तंत्रज्ञाने, अन्नप्रक्रिया, वेष्टन उद्योग आणि शीतगृह साखळी, हरित तंत्रज्ञाने आणि शाश्वत वाहतूक अशा उच्च क्षमतेच्या क्षेत्रांमध्ये- गुंतवणूक वाढवणे, यांचा त्यात समावेश असेल. शिवाय, सह-विकास आणि मोठ्या कंपन्या व लघु तथा मध्यम उद्योगांमध्ये एकत्रित प्रयत्न यांचाही त्यात अंतर्भाव अपेक्षित आहे.
  2. व्यापारी मेळावे आणि ठराविक काळाने होणारे व्यावसायिक मंचांचे कार्यक्रम यांमध्ये सहभागिता वाढवण्यास प्रोत्साहन देणे. यासाठी उद्योग महासंघ आणि आर्थिक संस्थांना सामील करून घेणे.
  3. औद्योगिक भागीदारी, तंत्रज्ञान केंद्रे आणि परस्परांकडे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच स्वयंचलन क्षेत्रातील उद्योग, अर्धवाहक, पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादन या क्षेत्रांतही गुंतवणुकीस चालना देणे.

III. संदेशवहन आणि दळणवळण

  1. हवामानबदल आणि पर्यावरण संतुलन यांचे संदर्भ लक्षात घेत शाश्वत वाहतूक क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करणे
  2. सागरातील आणि जमिनीवरील पायाभूत सुविधांमध्ये सहयोग वाढवणे. तसेच IMEEC च्या अर्थात भारत- मध्यपूर्व- युरोप आर्थिक मार्गिकेच्या आराखड्यातही सहयोग वाढवणे आणि सागरी आणि बंदर क्षेत्रातील सहकार्य कराराला अंतिम स्वरूप देणे.

IV. विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, नवोन्मेष, आणि स्टार्ट अप

  1. महत्त्वपूर्ण आणि उगवत्या तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात सहकार्याचा विस्तार करणे. उभय देशांत दूरसंवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेवांचे अंकीकरण (डिजिटलायझेशन) या क्षेत्रांतील तंत्रज्ञानात्मक मूल्यसाखळीत भागीदारी बळकट करणे.
  2. उद्योग 4.0 म्हणजेच चौथ्या औद्योगिक क्रांतीतील नवीन संधींची क्षितिजे शोधणे, तसेच प्रगत उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजांचे उत्खनन आणि शुद्धीकरण यांतील संधींचा शोध घेताना अभ्यासक आणि उद्योगजगताला सामील करून घेणे. यामध्येच उभय देशांच्या लघु आणि मध्यम उद्योगांचा तसेच स्टार्ट अप उद्योगांचा समावेश असला पाहिजे.
  3. इटलीच्या आणि भारताच्या राष्ट्रीय संशोधन प्राधान्यक्रमांचा विचार करता, नवोन्मेष आणि संशोधनातील सहकार्यात वाढ करणे. शिवाय, IPOI म्हणजेच हिंद-प्रशांत महासागरीय पुढाकाराच्या संदर्भात सामायिक हिताच्या मुद्द्यांवर सहकार्य उंचावणे.
  4. शिक्षण आणि संशोधन यांतील- विशेषतः STEM म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी-गणित या क्षेत्रातील- संधी वाढवणे, शिवाय आघाडीच्या वैज्ञानिक संस्थांमधील आणि संयुक्त प्रकल्पांमधील सहयोग वाढवत शिष्यवृत्तींवर लक्ष केंद्रित करणे.
  5. दोन देशांमधील स्टार्ट अप आणि संबंधित नवोन्मेषी परिसंस्था यांमधील संवाद/देवघेव यांस प्रोत्साहन देणे. एकंदरीतच, वित्त-तंत्रज्ञान (फिनटेक), शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळ्या, कृषीतंत्रज्ञान, चिप रचना आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांवर भर देणे.
  6. भारत-इटली नवोन्मेष आणि परिपक्वन आदान-प्रदान कार्यक्रम सुरु करण्यास प्राधान्य देणे. शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमधील वैज्ञानिक नवोन्मेष आणि परिपक्वन (इन्क्युबेशन) परिसंस्था यांना गती देण्याच्या उद्देशाने सामूहिक कौशल्य आणि क्षमता यांच्यात समन्वयाने वाढ करणे.
  7. सहकार्याचा कार्यकारी कार्यक्रम व त्याचा वारसा यांचे महत्त्व लक्षात घेऊन नव्या द्विपक्षीय सहकार्याच्या साधनांनी त्यास अधिक समृद्ध व उपयुक्त कसे करता येईल, ते पाहणे.
  8. 2025-27 या काळासाठी विज्ञान- तंत्रज्ञानात्मक सहकार्याचा कार्यकारी कार्यक्रम लागू करणे, तो या वर्षाच्या अखेरीपर्यंत कार्यान्वित करणे. यामधून दोन्हीकडे संशोधन आणि वाहतूक विषयक महत्त्वपूर्ण संयुक्त प्रकल्पांची एकत्रितरीत्या पायाभरणी करता येईल.

V. अंतराळ क्षेत्र

  1. ASI म्हणजेच इटालियन अंतराळ संस्था आणि इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांतील सहकार्याचा विस्तार करणे- जेणेकरून यात पृथ्वी-निरीक्षण, सौर-भौतिकशास्त्र आणि चांद्रविज्ञानावर भर देत अंतराळ शोध यासंबंधीच्या प्रकल्पांचा समावेश करता येईल.
  2. बाह्य अंतराळाचा उपयोग शांततामय आणि शाश्वत पद्धतीने करता यावा यासाठी दूरदृष्टी, संशोधन आणि विकास करण्याच्या दिशेने सहकार्य वृद्धिंगत करणे.
  3. मोठे उद्योग, सूक्ष्म-लघु-माध्यम उद्योग आणि स्टार्ट अप यांना सहभागी करून घेऊन परस्परांशी वाणिज्यिक स्तरावर अंतराळ सहयोग करण्याच्या संधींचा शोध घेणे आणि तशा संधी एकमेकांना देणे.
  4. साधारणपणे 2025 च्या मध्यापर्यंत, इटलीच्या अंतराळ उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भारताच्या मोहिमेवर येईल, अशा दृष्टीने संघटन करणे. यामध्ये संशोधन, अंतराळ-शोध आणि वाणिज्यिक सहयोग यांवर भर दिला जाईल.

VI. उर्जा स्थित्यंतर

  1. सर्वोत्तम प्रक्रिया तसेच अनुभव सामायिक करणे, एकमेकांच्या औद्योगिक परिसंस्था जाणून  घेण्याला प्रोत्साहन देणे आणि औद्योगिक भागीदारीला सुलभता प्राप्त करून देणे या उद्देशाने “तंत्रज्ञान विषयक शिखर परिषदा” आयोजित करणे
  2. तंत्रज्ञानातील प्रगती तसेच संयुक्त संशोधन आणि विकासविषयक प्रक्रियांना सुलभता मिळवून देणे.
  3. हरित हायड्रोजन, जैवइंधन, नवीकरणीय आणि उर्जा कार्यक्षमता यांच्या बाबतीत उपरोल्लेखित सहकार्य सुलभ करण्यासाठी नवीकरणीय उर्जेसंदर्भातील संयुक्त कृती गटाला अधिक चालना देणे.
  4. जागतिक जैवइंधन आघाडी आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बळकट करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे.
  5. नाविन्यपूर्ण ग्रीड विकासविषयक उपाययोजना आणि नवीकरणीय ऊर्जेशी संबंधित नियामकीय पैलू यांच्या संदर्भातील माहिती सामायिक करणे

VII. संरक्षण सहकार्य

  1. माहिती भेटी तसेच प्रशिक्षणविषयक कार्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी संयुक्त संरक्षण सल्लागार (जेडीसी) बैठका तसेच संयुक्त कर्मचारी पातळीवरील चर्चा (जेएसटी) यांच्या वार्षिक पातळीवरील बैठकांचे आयोजन सुनिश्चित करणे.
  2. हिंद-प्रशांत प्रदेशात इटलीच्या वाढत्या स्वारस्याच्या आराखड्यात संबंधित सशस्त्र दलांतील संवादांचे स्वागत करणे.अशा संवादांना पाठबळ देणाऱ्या कोणत्याही उपयुक्त व्यवस्थेसाठी वाटाघाटींसह आंतरपरिचालन आणि सहकार्य वाढवण्याच्या उद्देशासह हा उपक्रम राबवणे.
  3. तंत्रज्ञान विषयक सहकार्य, संरक्षण विषयक मंच तसेच उपकरणे यांची सहनिर्मिती आणि सहविकास यांच्यावर लक्ष केंद्रित करून सुधारित भागीदारी तसेच सार्वजनिक आणि खासगी भागीदारांमधील संवाद यांचे मार्ग शोधणे.
  4. सागरी प्रदूषण प्रतिसाद आणि सागरी शोघ तसेच बचाव या क्षेत्रांमधील सहकार्यासह  सागरी सहकार्यात वाढ करणे.
  5. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांच्या दरम्यान संरक्षण औद्योगिक आराखडा निश्चित करण्यासाठी वाटाघाटी करणे तसेच भारतीय संरक्षण सामग्री उत्पादक (एसआयडीएम) आणि इटलीचा अवकाश, संरक्षण आणि सुरक्षा (एआयएडी) महासंघ यांच्या दरम्यान सामंजस्य कराराला (एमओयु) चालना देणे.
  6. संरक्षण संशोधन क्षेत्रात वैज्ञानिकांचा आणि तांत्रिक बाबींमधील तज्ञ व्यक्तींचा सहभाग असलेल्या नियमित संवादांचे आयोजन करणे.

VIII. सुरक्षाविषयक  सहकार्य

  1. सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे यांसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये नियमित देवाणघेवाण तसेच क्षमता निर्मितीच्या माध्यमातून संरक्षा सहकार्यात वाढ करणे
  2. सायबर चर्चांसारख्या क्षेत्र-विशिष्ट चर्चांचे आयोजन करणे, धोरणे पद्धती आणि प्रशिक्षण यांच्या संधी यांच्या संदर्भात अद्ययावत माहितीची देवाणघेवाण करणे, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा बहुपक्षीय मंचांवर सहकार्याशी संबंधित चर्चांचे आयोजन करणे.
  3. आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे यांच्याशी सामना करण्यासंदर्भातील संयुक्त कृती गटाच्या द्विपक्षीय बैठकांचे वार्षिक पातळीवरील आयोजन यापुढेही सुरु ठेवणे.
  4. द्विपक्षीय, क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मंचांवर दहशतवादाविरोधातील लढ्यासाठी सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांनी पुढील बाबींवर सहमती व्यक्त केली:
    1. क्षमता निर्मिती कार्यक्रमांच्या आयोजनासह कायदेशीर बाबींमध्ये तसेच संबंधित पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य बळकट करणे.
    2. दहशतवादाविरोधातील लढ्यात माहिती तसेच सर्वोत्तम पद्धतींची माहिती सामायिक करणे
    3. परस्पर संरक्षण तसेच वर्गीकृत माहितीची देवाणघेवाण यांसाठी करार करणे

IX. स्थलांतर आणि गतिशीलता

  1. सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतर मार्गांना तसेच न्याय्य आणि पारदर्शक कामगार प्रशिक्षण आणि भर्ती प्रक्रियांना प्रोत्साहन देणे. यासंदर्भातील प्रायोगिक प्रकल्प  भारतातील आरोग्य व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना इटलीमध्ये रोजगार उपलब्ध करून देईल.
  2. अनियमित स्थलांतराला होणारी मदत रोखण्यासाठी सहकार्यात वाढ करणे.
  3. उच्च शिक्षण संस्थांच्या प्रभारी असलेल्या संबंधित प्रशासनांच्या दरम्यान देखील करार करून विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींची गतिमानता वाढवणे.

X. संस्कृती, शिक्षण क्षेत्र आणि जनतेमधील देवाणघेवाण, चित्रपट आणि पर्यटन

  1. दोन्ही देशांमधील विद्यापीठे तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहयोग आणि देवाणघेवाणीत वाढ करणे तसेच तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणे.
  2. परस्परांच्या सखोल माहितीसाठी तसेच दोन्ही देशांतील वस्तूसंग्रहालयांच्या दरम्यान भागीदारी स्थापन करुन प्रदर्शने आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे.
  3. आपापल्या देशांमध्ये चित्रपटांची सह-निर्मिती आणि चित्रपट तयार करणे यांत वाढ करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे.
  4. जुन्या तसेच वारसा स्थळांचे आणि इमारतींचे जतन आणि जीर्णोद्धार या संदर्भात द्विपक्षीय सहकार्य बळकट करणे.
  5. दोन्ही दिशांकडून संपर्क आणि पर्यटकांच्या ओघाला खतपाणी घालणे.
  6. द्विपक्षीय तसेच सांस्कृतिक बंध आणि दीर्घकाळ चालत आलेले मैत्रीचे बंध यांना अधिक प्रोत्साहन देण्यात चैतन्यमयी भारतीय आणि इटालियन समुदायांच्या योगदानाची पोचपावती देणे.
  7. वर्ष 2023 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या सांकृतिक सहकार्यविषयक कार्यकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे.
मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …