ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची भेट घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन नेत्यांची झालेली भेट तसेच जून महिन्यात इटली येथे जी 7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीच्या वेळी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांची या वर्षभरातील ही तिसरी भेट आहे.
सदर बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याप्रती दोन्ही देशांची कटिबद्धता तसेच होरायझन 2047 आराखडा आणि इतर द्विपक्षीय करारांमध्ये निश्चित करण्यात आलेली द्विपक्षीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठीची सामायिक परिकल्पना यांना दुजोरा दिला. संरक्षण, अवकाश क्षेत्र तसेच नागरी अणुउर्जा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांसह एकूणच द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली आणि धोरणात्मक स्वायत्ततेसाठी त्यांच्यातील सामायिक वचनबद्धतेला बळकटी देण्याच्या दृष्टीने या प्रगतीला आणखी वेग देण्याप्रती कटिबद्धता व्यक्त केली. भारताच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय प्रकल्पासंदर्भातील प्रगतीचा देखील त्यांनी आढावा घेतला.
या बैठकीत नेत्यांनी, दोन्ही देशांदरम्यान डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांसारख्या क्षेत्रांसह व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संबंधांच्या तसेच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारत-फ्रान्स भागीदारीच्या बळकटीकरणाची प्रशंसा केली. या संदर्भात, फ्रान्समध्ये आगामी कृत्रिम बुद्धीमत्ता कृतीविषयक शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले.
दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपापली मते मांडली. बहुपक्षीयता पुनरुज्जीवीत करण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच स्थिर आंतरराष्ट्रीय व्यवस्था उभारण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.