नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH),ही क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांची एक घटक संस्था आहे.मधुमेहासंबंधित सक्षम क्लिनिकल आणि डिजिटल आरोग्यसेवा मानकांच्या वापराद्वारे भारतातील मधुमेहाविषयी काळजी आणि त्याची गुणवत्ता आणि सातत्य यासंदर्भात संस्थेने आज रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया (RSSDI) यांच्या सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.RSSDI ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे जी देशभरातील 12,000 हून अधिक मधुमेह सेवाप्रदात्यांचे प्रतिनिधित्व करते.
राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र आणि मान्यता कार्यक्रमाद्वारे मधुमेह व्यवस्थापन आणि संशोधन यासंबंधी सर्वोत्तम क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी RSSDI चे कौशल्य वापरून NABH ला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांचा लाभ घेणे या सामंजस्य करारान्वये शक्य होईल.यामुळे मान्यताप्राप्त मधुमेह चिकित्सालये मधुमेहावरील उपचारांसाठी उच्च दर्जाची काळजी घेत मधुमेहाविषयी प्रशिक्षण, संशोधन आणि सूचना-निर्देशित काळजी आणि मार्गदर्शन अशा उपक्रमांसाठी सक्षम होतील. हे दवाखाने प्रशिक्षित समूहाद्वारे वितरीत केलेल्या वैयक्तिक काळजीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करु शकतील ज्यामुळे रुग्णांना त्यांची उपचारांकरीता शिफारस केलेली लक्ष्ये पूर्ण करता येतील.
RSSDI सक्रियपणे NABH च्या ॲलोपॅथिक क्लिनिक ॲक्रिडिटेशन मानकांच्या प्रमाणीकरणाला आणि त्याच्या सदस्यत्वासाठी प्रोत्साहन देईल, परिणामी देशभरात मधुमेहाची सेवा आणि काळजी उत्तमप्रकारे आणि प्रमाणित मानकांनुसार घेण्यासाठी सहकार्य उपलब्ध होईल आणि मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत कमी होण्यात मदत होईल.
तळागाळापर्यंत गुणवत्ता पोहोचवण्याच्या श्री जक्षय शाह यांच्या (अध्यक्ष, QCI) दृष्टीकोनाशीही भागीदारी संरेखित आहे आणि संपूर्ण आरोग्य सेवेच्या परीघात विशेष काळजी मानके विकसित करण्यासाठी आणि संपूर्ण भारतभर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी NABH ची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.RSSDI सोबतची युती हे देशभरातील आरोग्यसेवा गुणवत्तेत परिवर्तनीय सुधारणांच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पायाभूत स्तरावर गुणवत्तेच्या गरजांवर भर देत NABH चे अध्यक्ष रिझवान कोईता यावेळी म्हणाले, “मधुमेहाचा संपूर्ण भारतातील 250 दशलक्ष लोकांवर परिणाम होतो आणि एकूण आरोग्यसेवेच्या विश्वात मधुमेहाचे उत्तम व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.मधुमेह व्यवस्थापनासाठी प्रमाणित काळजी आणि पुराव्यांवर आधारित मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात NABH महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आम्ही दवाखान्यांसाठी डिजिटल हेल्थ स्टँडर्ड्स निश्चित करण्यास देखील उत्सुक आहोत, ज्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होईल.”
भारतातील मधुमेहावर अभ्यास करण्यासाठी संशोधन संस्था (रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया ,RSSDI) याची माहिती:
मधुमेहाच्या क्षेत्रात भारतात काम करणारी आणि IDF (आंतरराष्ट्रीय मधुमेह परीषद,इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन) द्वारे मान्यताप्राप्त असलेली RSSDI ही भारतातील व्यावसायिक डॉक्टर आणि संशोधकांची सर्वात मोठी संस्था आहे. सध्या, 23 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून या संस्थेचे 12,000 अधिक आजीवन सदस्य आहेत.
रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या (हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सना) आरोग्य सेवा संस्थांना मान्यता देण्यासाठी कार्यरत असलेली संस्था ॲक्रेडिटेशन बोर्ड NABH विषयी:
नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स ( NABH) ही गुणवत्ता निश्चित करणाऱ्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची एक घटक संस्था आहे.NABH ची स्थापना वर्ष 2005 मध्ये भारतातील आरोग्य सेवा संस्थांना मान्यता देण्यासाठी आणि काम करण्याची परवानगी देण्यासाठी स्थापन करण्यात आली. ”रुग्णालय प्रमाणिकरण मान्यता (हॉस्पिटल ॲक्रेडिटेशन)” हा पहिला मान्यता कार्यक्रम 2006 मध्ये सुरू करण्यात आला. गेल्या काही वर्षांत, NABH ने उद्योग, सरकार आणि भागधारकांच्या गरजा आणि मागणीनुसार इतर मान्यता तसेच प्रमाणीकरण कार्यक्रम विकसित केले आहेत. NABH ने रुग्णालये आणि HIS/EMR सिस्टम्ससाठी देखील डिजिटल आरोग्य मानके प्रमाणित केली आहेत.क्लिनिकल गुणवत्ता, रुग्णाची सुरक्षा आणि नवोपक्रम या विषयी भारतभरातील 22,000 हून अधिक आरोग्य सेवा संस्थांना आतापर्यंत NABHने प्रमाणित केले आहे.