संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीतील हवाई मुख्यालयात हवाई दल कमांडर्स परिषदेला संबोधित केले. या परिषदेला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस), जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग) आणि डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, सचिव (संरक्षण उत्पादन) संजय कुमार आणि भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ कमांडर उपस्थित होते.
हवाईदल मुख्यालयात त्यांचे आगमन झाल्यानंतर संरक्षण मंत्र्यांचे हवाई दल प्रमुख ए पी सिंग यांनी स्वागत केले. संरक्षण मंत्र्यांना हवाई दलाच्या परिचालन क्षमतांची माहिती देण्यात आली. परिषदेला संबोधित करताना, राजनाथ सिंह यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी दलाच्या समर्पण आणि व्यावसायिकतेचे कौतुक केले. नव्याने उद्भवत असलेल्या आव्हानांशी जुळवून घेण्याच्या हवाई दलाच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि आपली राष्ट्रीय उद्दिष्टे आणि आकांक्षा लक्षात घेऊन क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेला अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनविण्याचे मार्ग शोधण्याचे कमांडर्स आणि संरक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवाहन केले.
या परिषदेत प्रमुख परिचालन, प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. सिंग यांनी समन्वय वाढवण्यासाठी सीडीएस, लष्करप्रमुख आणि नौदल प्रमुख यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
ही परिषद आयएएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सध्याच्या आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी आणि संरक्षण क्षमतांमध्ये परिचालन उत्कृष्टता आणि आत्मनिर्भरता राखण्यासाठी भविष्यातील कृतींची रणनीती तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.