लष्कराने 18-19 नोव्हेंबर 2024 रोजी अहमदाबाद आणि पोरबंदर येथे, बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव, ‘संयुक्त विमोचन 2024’ यशस्वी आयोजन केले.
भारताची आपत्ती निवारण सज्जता दर्शवणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते.
भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडच्या कोणार्क पथकाने हा सराव संचलित केला. अहमदाबाद येथील सरावाच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘गुजरातच्या किनारी प्रदेशातील चक्रीवादळ’ या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणारा महत्त्वपूर्ण सराव प्रदर्शित करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हवामान विभाग आणि फिक्की चे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी, 19 नोव्हेंबर 24 रोजी पोरबंदर येथील चौपाटीवर बहु-संस्था क्षमता प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
बहु-संस्था क्षमतेच्या प्रात्यक्षिकात विविध संस्थांचे समन्वित लॉजिस्टिक, जलद प्रतिसाद आणि कल्पित चक्रीवादळ परिस्थितीत प्रभावी आपत्ती व्यवस्थापन धोरणांचा सराव केला जातो. या कार्यक्रमात भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय वायुसेना, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी इतर केंद्रीय आणि राज्य संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला.
आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने, प्रात्यक्षिकांच्या सोबतीने एक औद्योगिक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाने, भारतीय संरक्षण उद्योगांना आपत्ती प्रतिसाद तंत्रज्ञानामध्ये त्यांचे नवोन्मेष आणि उत्पादन क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले. या कार्यक्रमाने आपत्ती व्यवस्थापनातील आत्मनिर्भरता आणि तांत्रिक प्रगतीसाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित केली.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जागतिक मानवतावादी प्रयत्नांसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला. जगभरातील अनेकांना, राष्ट्रांना तसेच लोकांना त्यांच्या संकटकाळात महत्त्वपूर्ण सहाय्य प्रदान करण्यासाठी भारत आशेचा किरण आणि सहाय्यक म्हणून उदयास आला आहे, असे त्यांनी सांगितले. “भारतीय सशस्त्र दलाने अलिकडच्या काळात, शोध आणि बचाव मोहिमा, मानवतावादी मदत आणि वैद्यकीय सहाय्याची तरतूद यासह आपत्ती निवारण कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे”, असेही ते म्हणाले.
आखाती सहकार्य परिषद, हिंद महासागर क्षेत्र आणि दक्षिण पूर्व आशियातील नऊ मैत्रीपूर्ण देशांचे 15 वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी उपस्थित होते. त्यांच्या सहभागाने आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धती, याबाबतचे ज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापनातील अनुभवाची देवाणघेवाण होऊ शकते. ‘संयुक्त विमोचन 2024’ हा सराव भारताची तयारी आणि प्रतिसाद क्षमता मजबूत करण्यासाठी, जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनात आपले नेतृत्व मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.