केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभाग सचिव सुनील बर्थवाल यांच्यासह विभागाच्या अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी काल, 22 नोव्हेंबर 2024 रोजी नॉर्वेला भेट दिली. व्यापार व आर्थिक भागीदारी करारातील (टीईपीए) उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच भारतातून वस्तू व सेवांच्या निर्यातीसाठी ईएफटीए देशांमधील मोठी बाजारपेठ खुली करून 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची अंमलबजावणी करण्यास चालना देणे, हा या भेटीचा उद्देश होता.
मार्च 2024 मध्ये टीईपीए वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. टीईपीए हा आधुनिक तसेच महत्त्वाकांक्षी करार असून त्यायोगे भारताने युरोपमधील महत्त्वाच्या आर्थिक गटातील चार विकसित देशांशी करार केला. हा करार ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देऊन देशातील तरुण तसेच प्रतिभावान कार्यबळासाठी संधी उपलब्ध करून देईल. ईएफटीए त्यांच्या दरातून 92.2% देऊ करत असून त्यामध्ये भारताच्या निर्यातीमधील 99.6% भागाचा समावेश होत आहे. ईएफटीएचा बाजारपेठेतील प्रवेश 100% बिगर कृषी उत्पादनांना पोहोच देतो आणि प्रक्रियायुक्त कृषी उत्पादनांना (पीएपी) दरात सवलत देतो. भारत त्याच्या दराच्या 82.7% टेरिफ देतो आणि त्यामध्ये ईएफटीए निर्यातीमधील 95.3% चा समावेश होतो.
भारताने ईएफटीएला 105 उपक्षेत्रे देऊ केली आहेत आणि नॉर्वेकडून 114 वचनबद्धता सुरक्षित केल्या आहेत. टीईपीए माहिती तंत्रज्ञान विषयक सेवा, व्यापारविषयक सेवा, व्यक्तिगत, सांस्कृतिक, क्रीडा विषयक तसेच मनोरंजन विषयक सेवा, इतर शैक्षणिक सेवा, दृक-श्राव्य सेवा इत्यादींसारख्या भारतातील महत्त्वाच्या ताकदीच्या/ स्वारस्याच्या क्षेत्रांमध्ये आपल्या सेवांच्या निर्यातीला चालना देईल. ईएफटीए कडून देऊ करण्यात आलेल्या सेवांमध्ये सेवांच्या डिजिटल वितरण माध्यमातून अधिक उत्तम पोहोच (पद्धत 1), व्यवसायांमध्ये उपस्थिती (पद्धत 3) आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा देशातील प्रवेश आणि तात्पुरता निवास यासाठी सुधारित वचनबद्धता आणि विश्वसनीयता (पद्धत 4) यांचा समावेश आहे.
पायाभूत सुविधा आणि संपर्क सेवा, उत्पादन, यंत्रसामग्री, औषधनिर्माण, रसायने, अन्न प्रक्रिया, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स, बँकिंग तसेच वित्तीय सेवा आणि विमा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत यांना टीईपीए मुळे चालना मिळणार आहे.
टीईपीएमुळे येत्या 15 वर्षांमध्ये भारतातील तरुण महत्त्वाकांक्षी कार्यबळासाठी व्यावसयिक तसेच तांत्रिक प्रशिक्षणासाठी उत्तम सुविधा निर्माण होण्यासह मोठ्या प्रमाणात थेट नोकऱ्या निर्माण होण्यास गती मिळेल. टीईपीएद्वारे प्रिसिजन अभियांत्रिकी, आरोग्य सेवा, नवीकरणीय उर्जा, नवोन्मेष आणि संशोधन तसेच विकास या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या आघाडीच्या तंत्रज्ञानांची उपलब्धता सुलभ होऊन तंत्रज्ञानविषयक सहकार्यासाठी देखील उत्तम सुविधा निर्माण होणार आहेत.
या भेटीमध्ये नॉर्वेजियन चेंबर ऑफ कॉमर्स (एनएचओ), इनोव्हेशन नॉर्वे, जहाजबांधणी संघटन, रेदार बिंग लॉ फर्म आणि नॉर्वेतील नवीकरणीय उर्जा, नौवहन, भांडवली वस्तू, हरित हायड्रोजन, वस्त्रोद्योग, मत्स्य उत्पादने, खनन, माहिती तंत्रज्ञान आणि परस्पर स्वारस्याच्या इतर क्षेत्राशी संबंधित विविध कंपन्यांचे प्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह व्यापारी भागधारकांशी झालेल्या चर्चांचा समावेश होता.