प्रभावी विज्ञान संप्रेषणावर भर देत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ. जितेंद्र सिंह यांनी शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विज्ञानविषयक माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विज्ञान विशेष पत्रकारिता आणि विज्ञान विशेषज्ञ पत्रकार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मंगलम स्वामिनाथन राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 चे वितरण करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या प्रगतीमध्ये विज्ञानविशेष पत्रकारितेच्या मध्यवर्ती भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. अतिशय वेगाने बदलत असलेल्या या जगात विज्ञानाचे लाभ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी विज्ञान संप्रेषण अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. भारतामध्ये विज्ञान विशेष पत्रकारितेची संस्कृती निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या क्षेत्रामध्ये तज्ञांच्या कमतरतेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाश्चिमात्य देशांमध्ये विज्ञान आणि युद्ध वार्तांकन यावर विशेष तज्ञ पत्रकार असतात, मात्र, भारतात हेच पत्रकार वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी वार्तांकन करतात ज्यामुळे तज्ञांचा ज्ञानाचा आवाका कमी होतो, असे उदाहरण त्यांनी दिले. डॉ. मंगलम स्वामिनाथन यांनी हे कथन बदलून टाकण्यासाठी विशेषत्व वार्तांकनाच्या परंपरेला प्रोत्साहन देत यात बदल घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात टाकलेल्या मोठ्या पावलांकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.
लोकांना चांगल्या प्रकारे माहिती मिळालेली असेल आणि त्यात ते सक्रीय असतील तरच शास्त्रीय प्रगतीचे लाभ समाजाला मिळतील, असे डॉक्टर सिंह यांनी सांगितले. मिथके दूर करण्यामध्ये , गुंतागुंतीचे विषय सोपे करण्यात आणि शास्त्रीय ज्ञान सर्वांना उपलब्ध करून देण्यात विज्ञान संप्रेषणाची भूमिका महत्त्वाची असल्याकडे त्यांनी निर्देश केले.
डॉ. मंगलम स्वामीनाथन नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स, हा डॉ. मंगलम् यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आला असून विज्ञान संप्रेषण आणि पत्रकारितेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा त्यांचा उद्देश आहे. संप्रेषणकर्त्यांच्या पुढच्या पिढीला गुंतागुंतीच्या वैज्ञानिक कल्पना लोकांपर्यंत सहजसोप्या पद्धतीने पोहोचवण्याकरिता प्रेरित करण्यासाठी सुरू केलेले हे पुरस्कार आहेत. “डॉ. मंगलम स्वामीनाथन यांचा वारसा आपल्याला विज्ञान साक्षरतेला चालना देण्यासाठी प्रेरित करतो. कौशल्य आणि ध्यास कशा प्रकारे वैज्ञानिक प्रगती आणि लोकांची आकलनक्षमता यांच्यातील अंतर भरून काढू शकते, याचा दाखला त्यांच्या कार्यातून मिळतो ”, असे सांगत डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांना अभिवादन केले. भारतामध्ये नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहल यांची संस्कृती वाढीला लावण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला.