गुरुवार, नवंबर 14 2024 | 10:00:06 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / इफ्फिस्टा मध्ये चित्रपट, संस्कृती आणि कलेचा संगम

इफ्फिस्टा मध्ये चित्रपट, संस्कृती आणि कलेचा संगम

Follow us on:

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 ने इफ्फिस्टा या चित्रपट, खाद्यपदार्थ, कला आणि संवादात्मक सत्रांच्या जादूद्वारे सर्वांना एकत्र आणण्यासाठी आरेखित केलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमाच्या प्रारंभाची घोषणा केली आहे.  गोव्यातील पणजी येथील नयनरम्य सागर तीरावरील कला अकादमीमध्ये इफ्फिस्टा आयोजित केला जाईल.  21 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा होणारा हा महोत्सव सर्व वयोगटांना उत्सव आणि मनोरंजनाचा आनंद देणारा सप्ताह असेल.  या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक आकर्षणे असतील. हा कार्यक्रम अभ्यागतांना भारतीय संस्कृती, खाद्यपदार्थ, संगीत आणि चित्रपटातील चैतन्यपूर्ण विविधता अनुभवण्याची संधी देणार आहे.

पारंपरिक नृत्य सादरीकरण :

भारतातील अकरा पारंपारिक नृत्य मंडळे  आपला नृत्यविष्कार रंगमंचावर सादर करतील. ही मंडळे  भारतातील समृद्ध सांस्कृतिक वैविध्य आणि चैतन्यपूर्ण परंपरांचे आकर्षक नृत्य सादरीकरणाद्वारे प्रदर्शन करतील.

संपूर्ण भारताची खाद्ययात्रा अनुभवण्याचा आनंद :

खाद्ययात्रेत 15 ते 20 उत्कृष्ट स्थानिक आणि राष्ट्रीय उपहारगृहे असतील, जी अभ्यागतांना भारतभरातील विविध प्रकारच्या पाककृतींचा आस्वाद घेण्याची संधी देतील.  या यात्रेतील खाद्यपदार्थांची निवड, अभ्यागतांना भारतीय पाककृतींमधून एक स्वादिष्ट प्रवास उपलब्ध करून देत महोत्सवाची एकता आणि आनंदोत्सव ही संकल्पना प्रतिबिंबित करण्याच्या दृष्टीने निश्चित करण्यात आली आहे.

एनआयएफटी द्वारे फॅशन शो :

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) द्वारे आयोजित फॅशन शो गेल्या सहा दशकातील भारतीय चित्रपटांचा सन्मान करेल. सोबतच काही प्रतिष्ठित चित्रपटातील फिल्मी लुक्सद्वारे प्रेरित आकर्षक रचनांद्वारे चित्रपट आणि फॅशन यांच्यातील प्रगाढ नाते साजरे करेल.

चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व्यक्तींचा उत्सव :

येथील 4,000 चौरस फुटांचे भव्य प्रदर्शन राज कपूर, मोहम्मद रफी, अक्किनेनी नागेश्वर राव आणि तपन सिन्हा यांच्यासह चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचा वारसा साजरा करेल. हे परस्परसंवादी प्रदर्शन अभ्यागतांना एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव प्रदान करण्यासाठी, आभासी वास्तव आणि संवर्धित वास्तव तंत्रज्ञान वापरून, भारतीय चित्रपट सृष्टीच्या प्रारंभापासून ते आधुनिक काळातील चित्रपटांची उत्क्रांती प्रदर्शित करेल.

नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया’ कलाकृती :

ही कलाकृती, चित्रपट पुनरुज्जीवीत करण्याची कला आणि अभिजात चित्रपट जतन करण्यात गुंतलेल्या कष्टपूर्ण तरीही आनंददायी कामाचा ओढ निर्माण करणारा प्रवास उलगडेल.  अभ्यागत जुन्या काळातील प्रोजेक्टरवर जुन्या चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकतील.

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाची सफर  :

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाची एक आकर्षक दृकश्राव्य सफर अभ्यागतांना भारतीय चित्रपटाच्या समृद्ध वारशाच्या सफरीवर घेऊन जाईल. या सफरीत दृकश्राव्य माध्यमातून चित्रपटांचा इतिहास आणि आधुनिक सिनेमॅटिक कथाकथन यांचे मिश्रण अभ्यागतांसमोर सादर केले जाईल.

प्रसार भारती ओटीटी अनुभव केंद्र :

प्रसार भारती ओटीटी केंद्र महोत्सवात जाणाऱ्यांना ओटीटी (ओव्हर-द-टॉप) आशयाचे विस्तारित जग जाणून घेण्याची, डिजिटल चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील नवीनतम गोष्टी जाणून घेण्याची संधी देईल.

वेव्हज: क्रिएट इन इंडिया” संवाद दालन :

वेव्हज चॅलेंज दालन परस्पर संवाद साधण्याची संधी  देईल. तसेच, अभ्यागतांना सर्जनशील आव्हानांमध्ये सहभागी होण्याची आणि जागतिक मनोरंजन क्षेत्रामध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाबद्दल जाणून घेण्याची संधी देईल.

इन्फ्लेटेबल थिएटरमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन :

140-आसन क्षमता असलेल्या इन्फ्लेटेबल थिएटरमध्ये भारतीय पॅनोरमा आणि विविध ओ टी टी व्यासपीठांवरील लोकप्रिय चित्रपट दाखवले जातील. यामुळे महोत्सवाला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटाचा एक नाविन्यपूर्ण आणि जिव्हाळा वाढवणारा अनुभव मिळेल.

चाहत्यांचा चित्रपट ताऱ्यांशी संवाद :

झोमॅटो डिस्ट्रिक्ट एंटरटेनमेंट एरिना ही संस्था चित्रपट उद्योगातील प्रमुख व्यक्तींसोबत संवादाचा एक खास कार्यक्रम आयोजित करेल. या कार्यक्रमात चाहत्यांना चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व्यक्तींना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची, तसेच प्रश्नोत्तर सत्रे, स्वाक्षरी घेण्याची आणि सोशल मीडिया संवादांद्वारे उत्कृष्ट कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. याशिवाय मनोरंजन उद्योगातील काही प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क साधण्याची देखील संधी मिळेल.

संगीतडीजे आणि स्टँड-अप कॉमेडी :

झोमॅटोशी भागीदारीसह मनोरंजन क्षेत्र दररोज लोकप्रिय संगीत, डीजे परफॉर्मन्स आणि स्टँड-अप कॉमेडी शोसह लाइव्ह परफॉर्मन्सचे आयोजन करेल, ज्यामुळे महोत्सवाचे वातावरण अधिक उत्साही आणि चैतन्यपूर्ण होईल.

झोमॅटो डिस्ट्रिक्टने सादर करण्यात येणारा “द पल्स” हा उपक्रम खाद्यपदार्थ आणि करमणूकीसह विविध पाककृती, मजेदार खेळ यांच्यासह प्रसिद्ध संगीतकार, डीजे आणि स्टँड-अप कॉमेडियन यांच्या थेट सादरीकरणाचा आनंद लुटण्याची संधी प्रदान करेल. मनोरंजन क्षेत्र दर दिवशी संपूर्ण भारतातील विविध पारंपरिक नृत्य मंडळांचे नृत्याविष्कार प्रदर्शित करेल, तर खाद्यप्रेमी 15-20 पेक्षा जास्त स्थानिक आणि राष्ट्रीय उपहारगृहातून उपस्थितांची रसना तृप्त करू शकतील.

आता नाव नोंदणी करा आणि प्रतिनिधी व्हा :

इफ्फीच्या संपूर्ण प्रवासाचा अनुभव घेण्यास उत्सुक असलेल्यांसाठी, अर्ली-बर्ड प्रतिनिधी नोंदणी 1,000 रुपये + कर या विशेष दराने सुरू असून ती 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत खुली राहणार आहे. या तारखेनंतर, नोंदणी शुल्क  2,000 रुपये (करांसह) असेल.  ही नोंदणी इफ्फिस्टा च्या आठवडाभर चालणाऱ्या उत्सवासोबतच सर्व कार्यक्रमांत प्रवेश उपलब्ध करून देते.

एकता निर्माण करण्याच्या चित्रपटाच्या सामर्थ्याला ज्वलंत अभिवादन :

कथाकथनाची शक्ती आणि त्याद्वारे चित्रपट सर्व समुदायाला कशा प्रकारे एकत्र आणतो, ते साजरे करण्यासाठी इफ्फिस्टा ची रचना करण्यात आली आहे. परस्परसंवादी सेल्फी पॉइंट्स, फोटो बूथ, मंत्रमुग्ध करणारा अनुभव आणि इतर अनेक उपक्रमांद्वारे हा कार्यक्रम चित्रपटाच्या एकता निर्माण करणाऱ्या शक्तीला अभिवादन करतो. या कार्यक्रमामुळे अभ्यागतांना चित्रपट विश्वाशी आणि भारताला अद्वितीय बनवणाऱ्या विविध संस्कृतींशी जुळण्याची संधी मिळते.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे पोंडा आणि मडगाव येथे डिजिटल जीवन प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या (DoPPW) वतीने 11 नोव्हेंबर 2024 रोजी स्टेट बँक …